सत्ताधारी पक्षातील १२० नेत्यांची यादी ईडीला देईन, मग बघूया कुणाची चौकशी होते- संजय राऊत

या सगळ्या चौकशा पूर्ण होऊन जाऊ द्या, त्यानंतर सत्ताधारी पक्षातील १२० नेत्यांच्या नावांची यादी मी ईडी आणि अर्थ मंत्रालयाला पाठवणार आहे. मग ईडी यापैकी कोणाकोणाला नोटीस पाठवते हे बघूयात, असं म्हणत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपला (bjp) आव्हान दिलं आहे. 

शिवसेना प्रवक्ते प्रताप सरनाईक यांचं घर आणि कार्यालयावर ईडीकडून टाकण्यात आलेल्या धाडीचा संदर्भ घेऊन संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, प्रताप सरनाईक यांच्यावर केंद्राच्या इशाऱ्याने ईडीने केलेली कारवाई म्हणजे महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांवर दबाव टाकून राजकारण करण्याचा हा भाजपचा प्रयत्न आहे.

ईडी ज्या प्रकरणाच्या तपासाचा दावा करतंय त्याचा आपल्याशी काहीही संबंध नसल्याचा खुलासा सरनाईक यांनी केला आहे. मराठी माणसानं उद्योग-व्यवसाय करणं दिल्लीश्वरांना गुन्हा वाटत असेल आणि त्यासाठी ईडी किंवा इतर केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला संपवून टाकू असं धोरण कोणी राबवत असेल तर मराठी माणूस तुमच्या छाताडावर पाय ठेवून उभा राहील, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

हेही वाचा- ‘त्या’ आकसातूनच प्रताप सरनाईकांवर कारवाई- संजय राऊत

अवघ्या वर्षभरात ज्यांची संपत्ती कैक पटीने वाढली, जे घोटाळे करून देशाबाहेर पळाले, त्यांच्यावर ईडी कारवाई करणार आहे की नाही? असा प्रश्न विचारत हे सूडाचं राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही. आज पत्ते तुम्ही पिसताय, उद्या आम्ही डाव उलटवू, असं संजय राऊत म्हणाले.

अनेकजण मला विचारत आहे की मला ईडीची नोटीस आली की नाही? मी तर वाट बघतोय आणि आली तरी आश्चर्य वाटणार नाही. मला, अजित पवार किंवा आणखी कोणाला नोटीस आली तरी धक्का बसणार नाही. २० वर्षे जुनी थडगी उकरण्याचं काम सुरु असल्याचं मला कळलं आहे. आम्हीदेखील तयार आहोत. या सगळ्या चौकशा पूर्ण होऊन जाऊ द्या, त्यानंतर सत्ताधारी पक्षातील १२० नेत्यांच्या नावांची यादी मी ईडी आणि अर्थ मंत्रालयाला पाठवणार आहे. मग ईडी यापैकी कोणाकोणाला नोटीस पाठवते हे बघूयात, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

हेही वाचा- पहाटेच्या धक्क्यातून ‘ते’ अजून सावरलेले नाहीत- संजय राऊत
पुढील बातमी
इतर बातम्या