एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये हिंमत असेल तर निवडणुका जाहीर करा : उद्धव ठाकरे

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीशी युती केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी निवडणुकीची घोषणा करावी, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, "अजून निवडणुकांची घोषणा झालेली नाही, मला शिंदे गटाला निवडणूक घेण्याचे आव्हान करायचे आहे, शिंदे गट आणि भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी निवडणुका जाहीर कराव्यात".

यासोबतच ते म्हणाले की, "मोहन भागवत मशिदीत गेले, त्यांनी हिंदुत्व सोडले का? भाजपने पीडीपीसोबत युती केली तेव्हा त्यांनी हिंदुत्व सोडले का? ते जे करतात ते योग्य आहे आणि आम्ही काही करतो तेव्हा हिंदुत्व सोडतो. ते योग्य नाही. "

पुढचे राजकीय पाऊल काय असेल, पुढे काय करायला हवे? त्यावेळी आम्ही एकत्र निर्णय घेऊ. पण देशात जे चालू आहे ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आम्ही करणार आहोत.

दरम्यान, शिवशक्ती आणि भीमशक्तीचा राजकीय प्रयोग पहिल्यांदा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातच झाला होता आणि आता शिवसेनेतल्या फुटीनंतर पुन्हा एकदा हाच प्रयोग होताना दिसत आहे.

मात्र एकीकडे वंचित आणि शिवसेनेची हात मिळवणी होत असली तरी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस मात्र यापासून अद्याप दूर असल्याचं दिसतं आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी युतीचा राज्याच्या राजकारणावर कसा परिणाम होतो हे आगामी काळात समजू शकेल.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, "आज बाळासाहेब ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांचा वाढदिवस आहे आणि आम्ही एकत्र येऊन पुढचे पाऊल टाकण्यासाठी एकत्र आलो आहोत, माझे आजोबा आणि प्रकाश आंबेडकर यांचे आजोबा स्नेही होते, दोन्ही पिढ्यांचे वारसदार आणि आयुष्यभराचे सोबती होते".

'कंट्री फर्स्ट' असा विचार करून एकत्र येऊ, देशात लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत, पुढची राजकीय वाटचाल वेळेनुसार ठरवू.


हेही वाचा

शिवशक्ती-भीमशक्ती पुन्हा एकत्र, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकरांकडून युतीची घोषणा

आता येतोय ‘बाळासाहेबांचा राज’

पुढील बातमी
इतर बातम्या