जामिया हिंसाचार: कायदा शिकवणाऱ्या जावेद अख्तर यांना आयपीएसने सुनावलं

दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील हिंसाचारावरून बाॅलिवूडमधूनही तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या हिंसाचाराच्या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यापैकीच एका व्हिडिओवर कमेंट करताना प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी पोलिसांच्या कारवाईबद्दल नाराजी दर्शवली होती. त्यावर एका आयपीएस अधिकाऱ्याने अख्तर यांना चांगलंच सुनावलं आहे.

हेही वाचा- भाजपचं ‘आयटी सेल’च खरी तुकडे तुकडे गँग, अभिनेत्री रेणुका शहाणेची मोदींवर खरमरीत टीका

एका व्यक्तीने जामियातील घटनेचा व्हिडिओ ट्विटरवरून शेअर करताना त्यात अख्तर यांनाही टॅग केलं होतं. या व्हिडिओखाली, जामियाचे विद्यार्थी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवर हल्ला करत असून शांततापूर्वक म्हणवल्या जाणाऱ्या आंदोलनाचे ते खरे चित्र दाखवत आहेत. परंतु देशद्रोही आणि सेक्युलर लोकं यावर टीका करणार नाहीत. यालाच शहरी दहशतवाद असं म्हणतात. असं लिहिलं होतं. 

हेही वाचा- जामिया हिंसाचार: अक्षयने चुकून केलं ‘या’ व्हिडिओला लाईक, झाला पश्चाताप

या ट्विटवर व्यक्त होताना जावेद अख्तर यांनी लिहिलं की, देशातील कायद्यानुसार कुठल्याही विद्यापीठात तेथील अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय पोलिसांना आत जाता येत नाही. परंतु जामिया विद्यापीठाच्या आवारात पोलिसांनी घुसखोरी करून नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे यापुढं प्रत्येक विद्यापीठाला असा धोका असणार आहे.

जावेद अखर यांच्या ट्विटला आयपीएस अधिकारी संदीप मित्तल यांनी उत्तर दिलं आहे. प्रिय कायदेतज्ज्ञ. देशाचा कायदा आम्हाला समजावून सांगा. कायद्यातील कुठल्या अधिनियमात, कुठल्या कलमात हे म्हटलं आहे, हे आम्हाला सांगा. म्हणजे आम्हालाही ज्ञानप्राप्ती होईल, असा टोला त्यांनी अख्तर यांना लगावला आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या