अधिवेशनात गाजणार अवनी वाघिणीचा मुद्दा; शिवसेना आक्रमक

अवनी वाघिणीला मारल्याच्या मुद्यावरून शिवसेना चांगलीच आक्रमक झाली असून हिवाळी अधिवेशनात या मुद्यावरून सत्ताधाऱ्यांना शिवसेनेकडून घेरलं जाणार हे आता नक्की. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मुद्यावरून राज्य सरकारला तसंच वन आणि पर्यावरण मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना अधिवेशनात धारेवर धरा, अवनी वाघिणीला मारल्याचा मुद्दा अधिवेशनात जोरकसपणे उचलून धरा, असे आदेशच उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शिवसेनेच्या मंत्र्यांना दिले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षण, दुष्काळ आणि इतर प्रश्नांसह आता अवनी वाघिणीचा मुद्दाही अधिवेशनात गाजणार असं दिसतंय.

वन्यजीवप्रेमी आक्रमक

यवतमाळ येथील पांढकरकवडा आणि आसपासच्या २२ गावांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून एकच धसका होता, तो म्हणजे नरभक्षक अवनी वाघिणीचा. या वाघिणीनं वनात गेलेल्या १३ जणांचा जीव घेतला. त्यामुळं या वाघिणीच्या हत्येची परवानगी वनविभागानं सर्वोच्च न्यायालयाकडे मागितली आणि न्यायालयानं तशी परवानगी दिली. त्यानुसार गेल्या आठवड्यात शुक्रवारी अवनी उर्फ टी १ वाघिणीला बोराटीच्या जंगलात गोळ्या घालून वन विभागाकडून ठार करण्यात आलं. या वाघिणीच्या हत्येनंतर वन्यजीवप्रेमी संघटना आक्रमक झाल्या असून त्यांच्याकडून याचा निषेध केला जात आहे. 

वनमंत्र्यांचा राजीनामा मागितला 

विरोधी पक्षांनीही आता या वाघिणीच्या हत्येवरून सत्ताधाऱ्यांना घेरण्यास सुरूवात केली आहे. वाघिणीला बेशुद्ध करण्याएेवजी तिला मारलं का असा सवाल राज्यातूनच नव्हे तर देशभरातून विचारला  जात आहे. अगदी केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री मनेका गांधी यांनी राज्य सरकारवर नाराजी व्यक्त करत वनमंत्र्यांचा राजीनामा मागितला आहे.

भाजपावर निशाणा 

शिवसेनाही या मुद्यावरून चांगलीच आक्रमक झाली असून सामनाच्या अग्रलेखातूनही आपली आक्रमक भूमिका याआधी मांडली आहे. अवनी तुला भेकडासारखे मारले असं म्हणत शिवसेनेनं भाजपावर निशाणा साधला. सापाच्या शेपटीवर पाय ठेवल्यास तो तुम्हाला गुदगुल्या करणार का असा सवाल करत अवनीच्या हत्येवरून शिवसेनेनं यावरून अनेक सवाल भाजपासमोर उभे केले.

 आता यापुढं जात उद्धव ठाकरे यांनी आपल्या मंत्र्यांना हा मुद्दा अधिवेशनातही धरून लावण्याचे आदेश दिले आहेत. मुनगंटीवार यांना टार्गेट करास असंही त्यांनी मंत्र्यांना सांगितलं आहे. त्यामुळं आता अधिवेशनात अवणी वाघिणीचा विषय गाजणार का आणि त्याला सत्ताधारी कसे सामोरे जाणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरेल.


हेही वाचा - 

राज यांची आतिषबाजी, मुख्यमंत्र्यांसह अमित शाहंवर टीका

...तर सरकारवरही गोळ्या झाडायच्या का - संजय राऊत


पुढील बातमी
इतर बातम्या