उत्तर भारतीयांच्या मतांवर जिंकू शकतील का संजय निरूपम?

उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून संजय निरूपम यांना काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केली आहे. २००९ साली उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून त्यांनी राम नाईक यांचा पराभव केला होता. तर त्यापूर्वी २००४ साली गोविंदानं राम नाईक यांना धूळ चारली होती. खासदारकीशिवाय निरूपम यांच्या खांद्यावर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबादारही सोपवण्यात आली होती. परंतु काही दिवसांपूर्वीच त्यांची या पदावरून उचलबांगडी करण्यात आली आणि त्यांच्या जागी मिलिंद देवरा यांची नियुक्ती करण्यात आली. निरूपम यांची लढत शिवसेनेचे उमेदवार गजानन किर्तीकर यांच्यासोबत होणार आहे.

शिवसेनेतून सुरूवात

१९८८ साली जनसत्ता या वृत्तपत्रातून निरूपम यांनी आपल्या पत्रकारितेची सुरूवात केली होती. ५ वर्ष काम केल्यानंतर त्यांनी शिवसेनेचे मुखपत्र 'दोपहर का सामना'मध्ये काम कंलं. १९९६ मध्ये त्यांनी खासदाराच्या रूपात आपल्या राजकीय करिअरची सुरूवात केली. तसंच त्यांना शिवसेनेकडून राज्यसभेवर नियुक्त करण्यात आलं. २००० साली पुन्हा एकदा त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली होती.

२००५ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश

२००५ साली निरूपम यांनी शिवसेना सोडून काँग्रेसचा हात धरला. त्यांनी तत्कालिन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिवपदी नियुक्ती केली. त्यानंतर त्यांनी गोवा, महाराष्ट्र, गुजरात, नागालॅंडच्या निवडणुकांमध्येही पक्षाचं काम केलं. २००९ साली काँग्रेसकडून उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी लोकसभेत प्रवेश केला होता.

मुंबई काँग्रेस अध्यक्षपद

२०१४ साली गोपाळ शेट्टी यांनी निरूपम यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. काँग्रेसनं त्यांच्या खांद्यावर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर काँग्रेसमध्ये होणारी गटबाजी वाढत गेली. त्यामुळे काँग्रेसनं मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही निराशाजनक कामगिरी केली होती.

वादग्रस्त विधानं

अनेकदा आपल्या वादग्रस्त विधानांमुळे निरूपम चर्चेत राहिले होते. सर्जिकल स्ट्राईकनंतरही वादग्रस्त विधान करून त्यांनी सर्वांचा रोष ओढावून घेतला होता. तर एकदा त्यांनी स्मृती इराणी यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.

#MLviews

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून उचलबांगडी झालेल्या संजय निरूपम यांना लोकसभेसाठी मनाजोगती जागा पक्षाने देऊ केलीय. त्यामुळे ही जागा जिंकण्याचं मोठं चॅलेंज निरूपम यांच्यापुढं आहे. उत्तर भारतीयांसोबतच मराठी मतांचा जाेगवा मिळाल्यास फारसे चर्चेत नसलेल्या शिवसेनेच्या गजानन किर्तीकरांना ते चांगली लढत देऊ शकतील.


हेही वाचा-

ठाण्यात राष्ट्रवादीचं वाढतं वर्चस्व राजन विचारेंना त्रासदायक ठरेल?

कल्याणमधील राष्ट्रवादीचे अनुभवी उमेदवार बाबाजी पाटील मारतील का बाजी?


पुढील बातमी
इतर बातम्या