महाराष्ट्रात कोरोनाचे १० पॉझिटिव्ह रुग्ण : उद्धव ठाकरे

कोरोना व्हायरसनं पुण्यापाठोपाठ आता मुंबईत एन्ट्री केली आहे. मुंबईत कोरोनाचे २ रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या १० वर पोहोचली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेले अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळण्यात येणार आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशन गुंडाळलं

१४ मार्च म्हणजे शनिवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा समारोप करण्यात येणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसंच राज्यात कुठल्याही प्रकारचा मोठा समारंभ होणार नाही, असाही निर्णय मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

परदेशातून आलेल्यांनी 'हे' करा

कोरोनाच्या परिस्थितीवर सरकार लक्ष ठेवून आहे. विमानतळांवर तपासणी सुरू आहे. जे परदेशातून आले आहे, त्यांनी घाबरून जाऊ नये. घरी आल्यानंतर निदान १४ दिवस घरातच राहावे, अशी सुचनाही त्यांनी केली.

शाळा-कॉलेज सुरूच

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मंत्रिमंडळाची बैठक झाली. मुंबईतील नामांकित हॉस्पिटलमधील डॉक्टरांची मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. सध्या तरी शाळा बंद करण्यासाठी कोणताही निर्णय झालेला नाही. उलट शाळा बंद केल्या तर अधिक पॅनिक अवस्था होईल. त्यामुळे सध्यातरी शाळा कॉलेज बंद करण्यासारखी अवस्था नाही असं, डॉक्टरांनी सांगितलं. त्यात राज्यात पोहोचलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यात आली

'आयपीएलचे सामने प्रेक्षकाविना'

कोरोना व्हायरसची परिस्थिती पाहता राज्यात होत असलेल्या आयपीएलचे सामने हे प्रेक्षकांविना व्हावेत असा प्रस्ताव समोर आला आहे, याबद्दल चर्चा सुरू असून लवकरच निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

रुग्णांच्या आकड्यात वाढ

मुंबईत कोरोना व्हायरसचे २ नवे रुग्ण आढळले आहेत. कस्तुरबा रुग्णालयात दोन्ही रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यामुळे खळबळ उडाली आहे. मुंबईत २ जणांना कोरोनाव्हायरस असल्याचं निदान झाले आहे. दोघांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. त्यामुळे राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढला आहे.

दोन दिवसांपूर्वी पुण्यात कोरोना व्हायरसचे ५ रुग्ण आढळले होते. हा आकडा आता ८ वर गेला आहे. दुबईहून प्रवास करुन आलेले पुण्यातील २ प्रवासी कोरोना बाधित आढळल्यानंतर त्यांच्या निकटसहवासितांचा शोध घेणं युद्धपातळीवर सुरू आहे. या रुग्णांची मुलगी तसंच ज्या ओला टॅक्सीनं या रुग्णांनी मुंबई-पुणे प्रवास केला. टॅक्सी ड्रायव्हर आणि त्यांचा विमानातील सहप्रवासी हे तीन निकटसहवासित देखील कोरोना बाधित आढळले आहेत.

कोरोनाचा कहर

राज्यात २४ फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. ६ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. हे अधिवेशन २० मार्चपर्यंत चालणार होतं. पण राज्यात वाढत्या कोरोना रुग्णाच्या संख्येवरून ठाकरे सरकारनं हे अधिवेशन लवकरच संपवण्याचा निर्णय घेतला आहे. 


हेही वाचा

मनसेच्या शिवजयंती कार्यक्रमाला प्रशासनाचा नकार, राज ठाकरे नाराज

मनसेच्या शॅडो कॅबिनेटचं पवारांकडून कौतुक, म्हणाले...

पुढील बातमी
इतर बातम्या