सरकार स्थापनेत शिवसेनेची अडचण नाही- संजय राऊत

महाराष्ट्रात लवकरात लवकर सरकार स्थापन व्हावं. सत्तास्थापनेत शिवसेनेची कुठलीही अडचण नसल्याचं राज्यपालांच्या भेटीत सांगितल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. सोमवारी सायंकाळी राऊत आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी राजभवन इथं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. 

यानंतर पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी सांगितलं की, आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावतीने राज्यपालांना भेटलो. ही आमची सदिच्छा भेट होती. या भेटीत बाळासाहेब ठाकरे यांचं फटकारे हे पुस्तक तसंच उद्धव ठाकरे यांची पाहावा विठ्ठल व गडकिल्ल्यांबाबतचं पुस्तक राज्यपालांना भेट दिलं. या भेटीत महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवरही चर्चा झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. 

सत्तास्थापनेबाबत निमंत्रण देण्यावरून राज्यपालांशी काय चर्चा झाली? हा प्रश्न विचारला असता सरकार स्थापन व्हायला उशीर का होत आहे, हे माहीत नाही. परंतु सरकार स्थापनेत शिवसेनेचा कोणताही अडसर नसल्याचेही आम्ही राज्यपालांच्या निदर्शनास आणून दिलं.

राज्यपाल हे घटनेनुसार काम करत असतात. ते कोणत्याही पक्षाचे नसतात. सध्या महाराष्ट्राला जे राज्यपाल लाभले आहेत त्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे. त्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील. पण आम्ही एका मर्यादेत राहून राज्यपालांशी चर्चा केली, असंही राऊत यांनी सांगितलं.


हेही वाचा-

शिवसेनेला 'इतकी' खाती देण्याची भाजपाची तयारी

'या' कारणासाठी संजय राऊत घेणार राज्यपालांची भेट


पुढील बातमी
इतर बातम्या