Advertisement

'या' कारणासाठी संजय राऊत घेणार राज्यपालांची भेट

शिवसेना आणि भाजपामधील तिढा आणखी वाढला आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचे समजते.

'या' कारणासाठी संजय राऊत घेणार राज्यपालांची भेट
SHARES

राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागून दहा दिवस झाले आहेत. मात्र, भाजप-शिवसेना युतीच्या सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटत नाही. समसमान सत्तावाटप आणि अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदासाठी दोन्ही पक्षांमध्ये चढाओढ सुरु आहे. त्यातच आज सायंकाळी ५ वा. शिवसेना खासदार संजय राऊत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. ही भेट राजकीय नसून, सदिच्छा भेट असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार आणि तो शिवतीर्थावर शपथ घेणार असल्याची ठाम भूमिका राऊत वेळोवेळी प्रसारमाध्यमांसमोर मांडत आहे. त्यामुळे हा तिढा आणखी घट्ट झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर संजय राऊत आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचे समजते. मात्र ही भेट राजकीय नसून, सदिच्छा भेट असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे. भगतसिंह कोश्यारी स्वतः मुख्यमंत्री होते. संसदीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये त्यांनी काम केले आहे. त्यामुळे अशा बैठकांमध्ये राजकीय चर्चा होतातच, असे सूचक विधानही राऊत यांनी यावेळी केले.

तरुण भारतमधून टिका

शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेत 'सामना'तून भाजपवर टीकास्त्र सुरू ठेवले असताना आता 'तरुण भारत' या दैनिकातून संजय राऊत यांच्यावर जहरी टीका करण्यात आली आहे. तरुण भारतच्या अग्रलेखात संजय राऊत यांना 'बेताल' आणि 'विदूषक' संबोधण्यात आलं आहे. त्याबाबत राऊत यांना विचारणा केली असता. राऊत यांनी ‘मला माहीत नाही अशा प्रकारचे कोणते वृत्तपत्र आहे’ असे म्हणत  विषयाला बगल दिली.  त्यामुळे सेना-भाजपमधला वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा