
मुंबई कोस्टल रोडवरील उत्तर दिशेकडील मार्गावर बसवलेल्या म्युझिकल रोडचा पुन्हा एकदा विचार केला जात आहे. ब्रीच कँडी परिसरातील रहिवाशांकडून तक्रारी आल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) आपल्या सल्लागार संस्थेला यावर उपाययोजना सुचवण्याचे निर्देश दिले आहेत.
आवाजाचा परिणाम तपासण्यासाठी नॉईज डेसिबल स्टडी करण्याचे आदेशही दिले आहेत. 11 फेब्रुवारी रोजी या म्युझिकल रोडचे उद्घाटन करण्यात आले होते. वाहनं 70 ते 80 किमी प्रतितास वेगाने विशेष तयार केलेल्या खाचांवरून गेल्यावर ए. आर. रहमान यांच्या “जय हो” गाणं ऐकू येईल अशा पद्धतीने हा भारतातील पहिला म्युझिकल रोड तयार करण्यात आला होता. मात्र नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य म्हणून तयार केलेल्या या रस्त्याला परिसरातील रहिवाशांकडून तीव्र विरोध होत आहे.
नॉईज डेसिबल स्टडी म्हणजे एखाद्या भागातील आवाजाची तीव्रता मोजण्यासाठी केले जाणारे तांत्रिक परीक्षण होय. आवाजाची पातळी डेसिबल (dB) या एककात मोजली जाते आणि त्यासाठी विशेष साउंड लेव्हल मीटरचा वापर केला जातो.
निवासी भागात दिवसाच्या वेगवेगळ्या वेळांना आवाजाची पातळी तपासली जाते, जेणेकरून तो आवाज पर्यावरणीय नियमांनुसार अनुमत मर्यादेत आहे की नाही हे निश्चित करता येते. अशा अभ्यासाच्या निष्कर्षांवरून नागरी संस्था आणि पर्यावरण नियामक आवाज कमी करण्यासाठी आवश्यक बदल, निर्बंध किंवा उपाययोजना ठरवू शकतात.
ब्रीच कँडी परिसरातील 650 हून अधिक कुटुंबांनी मागील महिन्यात या म्युझिकल रोडविरोधात स्वाक्षरी मोहीम राबवून औपचारिक तक्रार केली होती. ही तक्रार त्यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे सादर केली.
तसेच हा प्रकल्प सार्वजनिक हितासाठी फारसा उपयुक्त नसून शांत आणि राहण्यायोग्य परिसर निर्माण करण्याच्या उद्दिष्टालाच विरोधाभासी असल्याचेही रहिवाशांचे म्हणणे आहे.
महापालिका अधिकाऱ्यांनी रहिवाशांनी व्यक्त केलेल्या चिंता मान्य केल्या असून प्रकल्पासाठी नियुक्त सल्लागार संस्थेला तांत्रिक उपाय सुचवण्यास सांगितले आहे.
रस्त्याची मूळ रचना कायम ठेवत आवाजाचा त्रास कमी करण्यासाठी कोणते उपाय करता येतील यावर सल्लागार काम करत आहे. याशिवाय विशेषतः रात्रीच्या वेळी आवाजाची पातळी तपासली जात असून या अभ्यासाच्या निष्कर्षांनुसार पुढील निर्णय घेतले जातील, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
हा म्युझिकल रोड नरिमन पॉइंट ते वरळी या कोस्टल रोडच्या उत्तर दिशेच्या मार्गावर, बोगद्यानंतर सुमारे 500 मीटर अंतरावर आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 6 कोटी खर्च करण्यात आला आहे.
रस्त्याच्या पृष्ठभागावर केलेल्या विशेष खाचा वाहनांच्या टायरमधून कंपन निर्माण करतात आणि त्या कंपनांमुळे संगीताच्या स्वरांसारखा आवाज निर्माण होऊन “जय हो”ची धून ऐकू येते. वाहनचालकांना पूर्वसूचना देण्यासाठी महापालिकेने 500 मीटर, 100 मीटर आणि 60 मीटर अंतरावर सूचना फलकही लावले आहेत.
म्युझिकल रोडची संकल्पना प्रथम 2007 मध्ये जपानमध्ये उदयास आली. अभियंता शिझुओ शिनोडा यांनी रस्त्याच्या बांधकामादरम्यान तयार झालेल्या खाचांमधून वाहनं गेल्यावर वेगळा आवाज निर्माण होत असल्याचे निरीक्षण केले होते. त्यानंतर या कल्पनेवर आधारित “मेलोडी रोड” विकसित करण्यात आले आणि जपानसह हंगेरी, दक्षिण कोरिया आणि संयुक्त अरब अमिराती यांसारख्या देशांमध्येही असे रस्ते तयार करण्यात आले.
सध्या सुरू असलेला BMC चा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर कोस्टल रोडवरील या म्युझिकल फीचरमध्ये बदल करणे आवश्यक आहे का? तसेच परिसरातील रहिवाशांना होणारा आवाजाचा त्रास कमी करण्यासाठी कोणती पावले उचलायची याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
हेही वाचा
