Advertisement

सण-उत्सवांमध्ये भेसळखोरांवर FDAची करडी नजर

महाराष्ट्रात पहिल्यांदाच ‘Festival Enforcement Calendar’

सण-उत्सवांमध्ये भेसळखोरांवर FDAची करडी नजर
SHARES

महाराष्ट्रात सण, जत्रा, उरूस आणि मोठ्या धार्मिक कार्यक्रमांच्या काळात होणारी अन्नभेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) वर्षभराचा विशेष अंमलबजावणी कार्यक्रम सुरू केला आहे. राज्यात पहिल्यांदाच अशा प्रकारचे ‘Festival Enforcement Calendar’ तयार करण्यात आले आहे.

FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही महिन्यांपासून अन्नसुरक्षेच्या कारवायांना वेग देण्यात आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता सण सुरू होण्यापूर्वीच संभाव्य भेसळीचे धोके ओळखून कारवाई करण्याची यंत्रणा तयार करण्यात आली आहे.

या नव्या कॅलेंडरनुसार सण, जत्रा, उरूस आणि धार्मिक कार्यक्रमांचे तीन श्रेणींमध्ये वर्गीकरण केले जाणार आहे. कार्यक्रमाचा आकार आणि भौगोलिक विस्तार लक्षात घेऊन प्रत्येक श्रेणीसाठी कोणते अन्नपदार्थ भेसळीच्या दृष्टीने संवेदनशील आहेत, कोणत्या प्रकारची भेसळ होऊ शकते, किती नमुने घ्यायचे आणि कोणती कारवाई करायची, हे आधीच निश्चित केले जाणार आहे.

विशेष म्हणजे, प्रत्येक सणाच्या 21 दिवस आधीपासून अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू केली जाणार असून ती 30 दिवसांपर्यंत सुरू ठेवता येणार आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात जोखमीची ठिकाणे निश्चित केली जातील, माहिती संकलित केली जाईल आणि विशेष पथके तयार केली जातील. तसेच टेस्टिंग किट, रसायने आणि प्रयोगशाळांमध्ये आवश्यक क्षमता उपलब्ध आहे की नाही, याची खात्री केली जाणार आहे.

सणाच्या सुमारे 14 दिवस आधी उत्पादन केंद्रे, गिरण्या, बाजारपेठा, गोदामे, कोल्ड स्टोरेज, घाऊक बाजार आणि इतर ठिकाणी तपासणी वाढवली जाणार आहे. रात्री उशिरा आणि पहाटेच्या वेळी वाहतूक होणाऱ्या अन्नसाठ्यांचीही तपासणी केली जाणार आहे.

सणाच्या काळात बाजारपेठांमध्ये सर्वेक्षण, छापे आणि ऑन-द-स्पॉट टेस्टिंग केले जाईल. सण संपल्यानंतर प्रयोगशाळेचे अहवाल तपासून आवश्यक असल्यास गुन्हे दाखल केले जातील आणि जप्त केलेल्या अन्नपदार्थांची नियमानुसार विल्हेवाट लावली जाईल.

FDAने 11 उच्च-जोखीम अन्नश्रेणी निश्चित केल्या आहेत. यामध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, मांस, मिठाई, उपवासाचे पदार्थ, खाद्यतेल, फळे, सुकामेवा, बेसन, पाणी आणि बर्फ, बेकरी उत्पादने, ई-कॉमर्सद्वारे विकले जाणारे खाद्यपदार्थ आणि आयात केलेल्या अन्नपदार्थांचा समावेश आहे.

उपवासाच्या पदार्थांमध्ये भगर, कुट्टूचे पीठ, शिंगाड्याचे पीठ, साबुदाणा आणि राजगिरा यांचीही तपासणी केली जाणार आहे. यामध्ये मायकोटॉक्सिन्स आहेत का, हेही तपासले जाईल.

दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची पहाटेच्या वाहतुकीदरम्यान विशेष तपासणी केली जाणार आहे. ईदच्या काळात मांसविक्रीची दुकाने, कत्तलखाने आणि कोल्ड-चेन सुविधांवर विशेष लक्ष दिले जाणार आहे.

तसंच, मोठ्या सणांच्या आधी आणि सणादरम्यान हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या तळणीच्या तेलाची TPC म्हणजे Total Polar Compounds ची तपासणी केली जाणार आहे. TPCचे प्रमाण 25 टक्क्यांपेक्षा जास्त आढळल्यास ते तेल नष्ट केले जाणार आहे.

मिठाईच्या दुकानांमध्ये अनधिकृत खाद्यरंग आणि चांदीच्या वर्खातील भेसळ तपासली जाणार आहे. अन्नपदार्थ वर्तमानपत्र किंवा छापील कागदात गुंडाळून दिल्याचे आढळल्यासही कारवाई केली जाणार आहे.

FDAची नजर केवळ पारंपरिक बाजारपेठांपुरती मर्यादित राहणार नाही. बेकरी, रेस्टॉरंट्स आणि क्विक-कॉमर्सच्या वेअरहाऊसेसमध्येही विशेष तपासणी केली जाणार आहे.

मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या सामुदायिक अन्नवाटप कार्यक्रमांनाही या मोहिमेत समाविष्ट करण्यात आले आहे. महाप्रसाद, इफ्तार, अन्नछत्र, लंगर आणि भंडारा याठिकाणी वितरित होणाऱ्या अन्नाचीही तपासणी केली जाणार आहे. आयोजकांना परवानाधारक केटरर्सची नियुक्ती करावी लागणार असून, कार्यक्रमाची माहिती FDAला आधी द्यावी लागणार आहे.

म्हणजेच, आता सणांच्या काळात अन्नभेसळ झाल्यानंतर कारवाई करण्याऐवजी सणाच्या आधीच संभाव्य धोके ओळखून उत्पादनापासून वाहतूक, साठवणूक, विक्री आणि सामुदायिक अन्नवाटपापर्यंत संपूर्ण साखळीवर FDAची नजर असणार आहे.



हेही वाचा

मुंबईतील पाणीपुरवठ्याबाबत पालिकेचे मोठे निर्देश

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा