Advertisement

आदित्य ठाकरेंकडून मिहिर कोटेचांच्या राजीनाम्याची मागणी

मुलुंडच्या मोकळ्या जागांवरून आदित्य ठाकरेंचा भाजप आमदारांवर निशाणा;

आदित्य ठाकरेंकडून मिहिर कोटेचांच्या राजीनाम्याची मागणी
SHARES

मुलुंडमधील मोकळ्या जागांच्या वापरावरून शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांनी भाजप आमदार मिहिर कोटेचा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुलुंडकरांची दिशाभूल केल्याचा आरोप करत आदित्य ठाकरेंनी मिहिर कोटेचा यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

मुलुंड पूर्व रेल्वे स्थानकाजवळ आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी आरोप केला की, मुलुंडच्या जमिनीचा एक इंचही विकासासाठी दिला जाणार नाही, असे आश्वासन यापूर्वी मिहिर कोटेचा यांनी दिले होते. मात्र, आता मुलुंडमधील अनेक एकर मोकळ्या जमिनी विविध प्रकल्पांसाठी राखीव ठेवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

या पार्श्वभूमीवर शिवसेना (UBT)कडून मिहिर कोटेचा यांच्या राजीनाम्याची मागणी करणारी स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा आदित्य ठाकरेंनी केली. या मोहिमेत 50 हजार नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन त्या राज्यपालांकडे सादर करण्यात येणार आहेत.

दरम्यान, मुलुंडमधील प्रस्तावित जमीन वापरातील बदलांवरही आदित्य ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केले. धारावी पुनर्विकास प्रकल्पातील अपात्र रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी सुमारे 48 एकर मिठागराची जमीन देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

तसंच, क्रीडा संकुलासाठी राखीव असलेल्या जमिनीचे आरक्षण बदलून तिथे पेट्रोल पंप उभारण्याचा प्रस्ताव असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

याशिवाय, हरी ओम नगर येथील डम्पिंग ग्राउंडच्या सुमारे 64 एकर जागेवर गोल्फ कोर्स उभारण्याच्या प्रस्तावावरही आदित्य ठाकरेंनी आक्षेप घेतला.

या सर्व प्रकल्पांमुळे मुलुंडच्या पायाभूत सुविधांवर अतिरिक्त ताण येऊ शकतो, तसंच परिसराच्या पर्यावरणावरही परिणाम होण्याची शक्यता असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

भाजप आणि स्थानिक आमदारांनी मुलुंडकरांना दिलेली आश्वासने पाळली नसल्याचा आरोप करत, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना जबाबदार धरणे आणि मुलुंडमधील मोकळ्या जागांचे संरक्षण करणे, हा स्वाक्षरी मोहिमेचा उद्देश असल्याचे आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केले.



हेही वाचा

अवैध जात प्रमाणपत्रावरून ठाकरेंच्या नगरसेविका विशाखा राऊत अपात्र

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा