शिवसेना आघाडीसोबत जाऊ नये म्हणून भाजपकडून अडथळे- पृथ्वीराज चव्हाण

राज्यात बिगर भाजप सरकार बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतु शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित येऊन सरकार बनवू नये, यासाठी भाजपकडून सातत्याने अडथळे आणले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. एका वृत्तवाहिनीशी बोलताना चव्हाण यांनी हा आरोप केला आहे. 

काय म्हणाले चव्हाण ? 

शिवसेनेसोबत काँग्रेस नेत्यांची सकारात्मक बाेलणी सुरू आहे. किमान समान कार्यक्रमाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. असं असताना शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत मिळून सरकार स्थापन करू नये, यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत, असं चव्हाण म्हणाले.

काँग्रेसकडून शिवसेनेला पाठिंब्याचं पत्र देण्यात उशीर का झाला? या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी सांगितलं की, शिवसेनेकडून पाठिंब्यासाठी जेव्हा काँग्रेसला अधिकृतरित्या संपर्क साधण्यात आला, तेव्हा शिवसेना एनडीएमध्ये असताना बोलणी होऊ शकत नाही, अशी काँग्रेसची भूमिका होती. परंतु केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अरविंद सावंत मंत्रीपदाचा राजीनामा देऊन सरकारबाहेर पडल्याने आमच्यातील संवाद सुरू झाला. आम्ही देखील काँग्रेस आमदारांशी चर्चा करून दिल्लीत जाऊन संबंधीत माहिती काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कळवली. 

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत चर्चा होईल, दोन्ही पक्षांत सत्ता स्थापनेबाबत एकमत झाल्यावरच शिवसेनेशी चर्चा करण्यात येईल, अशी माहिती उद्धव ठाकरे यांना दिली. सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यातही हेच बोलणं झालं. त्यानुसार ही चर्चा सकारात्मक पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेत वेळकाढूपणा झाला असं बोलणं योग्य ठरणार नाही, असंही चव्हाण म्हणाले. 


हेही वाचा- 

काँग्रेससोबत सकारात्मक चर्चा- उद्धव ठाकरे

मध्यावधी निवडणुकीची शक्यताच नाही, शरद पवार यांनी दिला आमदारांना विश्वास


पुढील बातमी
इतर बातम्या