ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील प्रकल्प रखडतील?

हो.. नाही.. करता करता अखेर राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा अधिकृत निर्णय शनिवारी घेतला खरा, पण या निर्णयामुळे राज्यातील प्रकल्प रखडण्याची शक्यता अर्थतज्ञ्जांनी व्यक्त केली आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा थोड्या फार प्रमाणात नव्याने येऊ घातलेल्या प्रकल्पांवर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या निर्णयामुळे काही प्रकल्पांना विलंब होऊ शकतो, अशी माहिती अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी ‘मुंबई लाइव्ह’ला दिली.

नव्याने येऊ घातलेले हे प्रकल्प रखडण्याची शक्यता 

- मेट्रो 3
- मोनो रेल
- मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण
- राज्यातील गृह प्रकल्प

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दुपारी मंत्रालयात पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांना सरसकट दीड लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याच्या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केली. या निर्णयानुसार, राज्यातील शेतकऱ्यांना 34 हजार कोटींची कर्जमाफी देण्यात येणार असून 90 टक्के शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असल्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली. या कर्जमाफीला ‘छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना’ असे नाव देण्यात आले आहे.

आजवर निरनिराळ्या राज्यांमध्ये प्रतिकुंटुंब देण्यात आलेली कर्जमाफी  

 राज्य

कर्जमाफी (रुपये)

केरळ

2,13,000

आंध्रप्रदेश

1,23,400  

पंजाब

1,19,500

तामिळनाडू

1,15,900  

कर्नाटक

97,200  

तेलंगणा

93,500  

हरयाणा

79,000  

राजस्थान

70,500  

महाराष्ट्र

54,700


संपूर्ण देशाची एकूण कर्जमाफी -  52,000 कोटी रुपये

राज्य

कर्जमाफी (रुपये)

तेलंगणा

15,000 कोटी

आंध्रप्रदेश

20,000 कोटी

पंजाब

10,000 कोटी

कर्नाटक

8000 कोटी

महाराष्ट्रा

34,022 काेटी


या आहेत महत्त्वाच्या घोषणा -

  • 34,000 कोटींची कर्जमाफीला कॅबिनेटची मंजुरी
  • 89 लाख शेतकऱ्यांना 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी, दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ
  • शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार
  • ज्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन झाले आहे त्यांचे मध्यम मुदतीचे कर्ज देखील माफ
  • 6 टक्के शेतकऱ्यांना ओटीएसखाली आणणार
  • पीककर्जासोबत मध्यम कर्जही माफ टर्म लोन माफ

89 लाख शेतकऱ्यांना फायदा 

सरकारच्या या निर्णयाचा फायदा राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांना होणार असून 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णपणे कोरा होणार अाहे. या कर्जमाफीनुसार दीड लाखांपर्यंतचे कर्ज नावावर असणाऱ्या शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करण्यात आले आहे. तर उर्वरित 6 टक्के शेतकऱ्यांच्या कर्जफेडीत दीड लाख रूपयांचा वाटा राज्य सरकारचा असेल.

नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 25 हजारांचे अनुदान

येत्या काळात शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी सरकारने 'छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान' योजना आणली आहे. जे शेतकरी कर्जाचे हप्ते नियमितपणे भरतात, त्यांना 25 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे.

आजवरची सर्वात मोठी कर्जमाफी 

राज्यातील सर्व शेतकरी कर्जमुक्त व्हावा, यासाठी राज्य सरकार सुरूवातीपासूनच प्रयत्न करत होते. अखेर आज आम्ही निर्णय घेऊन कर्जमाफीची घोषणा केली. कुठल्याही सरकारने महाराष्ट्रात दिलेली ही आजपर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सगळ्यांशी चर्चा करूनच घेतला निर्णय

विधानसभेतील विरोधी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शेतकरी नेते खासदार राजू शेट्टी, रघुनाथ पाटील, सुकाणू समितीची सदस्य यांच्याशी चर्चा करूनच आम्ही हा निर्णय घेतल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.


घोटाळे होणार नाही याकडे बारीक लक्ष 

सरकारने कर्जमाफी तर केली. मात्र कर्जवाटपात घोटाळे होऊ नयेत, यावर सरकारचे बारीक लक्ष असणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले


हे वाचा - 

अखेर शेतकऱ्यांचा संप मागे

शेतकऱ्यांच्या संपात फूट


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या