Advertisement

शेतकऱ्यांच्या संपात फूट


शेतकऱ्यांच्या संपात फूट
SHARES

मुंख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शनिवारी पहाटे झालेल्या बैठकीनंतर शेतकऱ्यांनी राज्यव्यापी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र अवघ्या काही तासांतच शेतकरी संघटनेमध्ये फूट पडली आहे. त्यामुळे संप मागे घेण्याची घोषणा होऊनही पुणतांबा आणि नाशिक येथील शेतकऱ्यांनी संपावर आपण ठाम असल्याचे सांगितले. कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव मिळवण्यासाठी शेतकऱ्यांकडून पुकारण्यात आलेल्या संपाची सर्व सूत्रे पुणतांब्यातून हलवण्यात येत होती. मात्र, सरकारशी समझोता केल्यानंतर या कोअर कमिटीच्या शेतकऱ्यांमध्येच वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे आता नाराज शेतकऱ्यांच्या गटाने पुणताब्यांत कोअर कमिटीच्या निर्णयाविरोधात आंदोलन सुरू केले आहे. संपूर्ण चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी शेतकरी सदस्यांना गुंडाळलं, सदस्यांची दिशाभूल केली आहे. संपूर्ण कर्जमाफीची मागणी मान्य केलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी गोलमाल उत्तरे दिली आहेत. मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारे आहे. संपूर्ण कर्जमाफी आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू होत नाही, तोवर संप मागे घेणार नाही, अशी भूमिका काही शेतकऱ्यांनी घेतली.

दरम्यान अहमदनगरमधील काही शेतकरी शनिवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याच्या समोर दूध ओतून आंदोलन करणार होते. पोलिसांना याची खबर लागताच मानखुर्द पोलिसांनी 8 शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. या शेतकऱ्यांमधे संभाजी पाटील, संतोष नानावटे, सोमनाथ कराळे, रमेश बोरुडे यांच्यासह अजून 4 शेतकरी आहेत. शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक म्हणजे विश्वासघात -
शेतकऱ्यांचा संप आजही सुरु अाहेच. मुख्यमंत्र्यासोबतची बैठक म्हणजे शेतकऱ्यांसोबतचा विश्वासघात आहे. जयाजी सूर्यवंशी हे सूर्याजी पिसाळ आहेत. शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळलं जातंय. संपकरी शेतकऱ्यांची एकही मागणी मुख्यमंत्र्यानी मान्य केलेली नाही. संपकरी शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा महाराष्ट्र किसान सभेचा आरोप आहे. संप मागे घ्यायचा असेल, तर तो सर्वानुमते मागे घ्यायला हवा. ज्यांना लोकं ओळखत नाही त्यांनी संप मागे घेण्याची गोष्ट करणं हास्यास्पद आहे. शुक्रवारी रात्री मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी सदाभाऊ खोत यांच्यासोबत गेलेले सूर्यवंशी अाणि सतिश गिटे यांना कृषीमूल्य आयोगावर घेण्याची सेटिंग झाली म्हणूनच त्यांनी संप मागे घेतल्याची घोषणा केली. यामुळे शेतकर्‍यांचे अांदोलन विस्कळीत झाल्याचे वाटत असले, तरी आम्ही हा संप अजून तीव्र करणार आहोत. शेतकरी संपाला विरोध करणारे सर्व शेतकरी आणि त्यांच्या संघटनांची एक बैठक 8 जूनला नाशिकमध्ये घेण्यात येईल. गेल्या 25 वर्षांत देशभरात 4 लाखांपेक्षा शेतकर्‍याच्या अात्महत्या झाल्या आहेत. त्यापैकी राज्यात 75 हजार शेतकर्‍यांच्या अात्महत्या झाल्याची दिल्लीतील NCRB या संस्थेची अाकडेवारी अाहे. मूठभर उद्योगपतींना सरकार 11 लाख कोटींची कर्जमाफी देते, पण शेतकर्‍यांची कर्जमाफी करत नाही ही विसंगती आहे.

- कॉ. अशोक ढवळे  


मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या चर्चेला मी पूर्णवेळ उपस्थित होतो. शेतकऱ्यांना कर्जमाफी, स्वामिनाथन अायोगाची अंमलबजावणी, शेतकरी पेन्शन योजना लागू करणे या महत्वाच्या मागण्याबद्दल मुखमंत्र्यानी या चर्चेत बोलणं अपेक्षित होतं. मात्र मुख्यमंत्र्यानी याबाबत कोणतंही ठोस विधान केलं नाही. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला मुख्यमंत्र्यांनी तत्वत: मान्यता दिल्याचे सांगणे ही सरळसरळ दिशाभूल आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची 31 ऑक्टोबरची घोषणाही चुकीची आहे. 31 ऑक्टोबर ही मुख्यमंत्र्यानी नेमलेल्या समितीच्या अभ्यासाची मुदत आहे.शेतकऱ्यांना पेन्शन मिळणार नाही असं मुख्यमंत्री स्पष्टपणे बोलले आहेत.

- कॉ. अजित नवले  






Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा