विनायक मेटेंच्या मृत्यूची CID चौकशी, CM एकनाथ शिंदेंचे आदेश

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या मृत्यूची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस महासंचालकाना दिले आहेत.

मराठा समाजाचे नेते अशी ओळख असलेल्या विनायक मेटे यांच्या गाडीला 14 ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मेटे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी शंका उपस्थित केली होती.

आता एकनाथ शिंदे यांनी या अपघात प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. आज त्यांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना या मृत्यूची सीआयडी चौकशी करून आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश शिंदे यांनी दिले आहेत.

विनायक मेटेंच्या अपघातानंतर ज्योती मेटे यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला. ज्योती मेटे म्हणाल्या की, 'अपघात झाल्यानंतर माझं कारचालक एकनाथ कदम याला सातत्याने एकच म्हणणं होतं की, साहेबांशी बोलणं करून दे. साहेबांच्या दोन्ही नंबरवर मी फोन केले, पण ते फोन उचलत नव्हते. माझं त्यांच्याशी बोलणं झालं नाही तर मला वाटत होतं किमान सुरक्षारक्षकाशी तरी बोलणं व्हावं, कारण तोपर्यंत मला माहीत नव्हतं की सुरक्षारक्षकही जखमी आहे. मात्र एकनाथ हा कोणाशीच बोलणं करून देत नव्हता'.

दरम्यान, अपघात प्रकरणात मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांच्या आरोपानंतर मेटे यांचे दुसरे चालक समाधान वाघमारे यांनी मोठा खुलासा केला आहे.

'शिक्रापूर रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासा त्यामधून बरंच काही बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया समाधान वाघमारे यांनी दिली. समाधान वाघमारे हे विनायक मेटे यांच्याकडे चालक म्हणून काम करत होते.

मात्र ,14 तारखेला त्यांच्या वडिलांचं श्राद्ध होतं, त्यामुळं ते सुट्टीवर होते. समाधान वाघमारे म्हणाले की, 3 ऑगस्ट रोजी आम्ही गडबडीत मुंबईच्या दिशेने जात होतो. या दरम्यान शिक्रापूरलगत आम्हाला एका इर्टिगा गाडीने दोन वेळा चांगलाच कट मारला. असा खुलासा वाघमारे यांनी केला आहे. त्यामुळे विनायक मेटेंच्या गाडीचा अपघात होता की घातपात असा संशय व्यक्त केला जात आहे.


हेही वाचा

जांबोरी मैदान तो झांकी है पिक्चर अभी बाकी है : आशिष शेलार

“50 खोके एकदम ओके!”, विरोधक शिंदे गटाविरोधात आक्रमक

पुढील बातमी
इतर बातम्या