महाराष्ट्रात पुन्हा लाॅकडाऊन वाढणार?, उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर काही प्रमाणात ओसरत चालला आहे. व्यावसायिक, नोकरदार उद्योगधंदे सुरू कधी होतील, याची आतुरतेने वाट बघत आहेत. त्यातच १ जून रोजी लाॅकडाऊनचा कालावधीही संपत आहे. या पार्श्वभूमीवर कोकणच्या दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लाॅकडाऊन वाढणार की नाही? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना लाॅकडाऊनसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा त्यांनी सांगितलं की, कोरोना कमी होतोय हे नक्कीच आहे. पण आताच त्यावर मी काही बोलणार नाही. कारण कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी आपण अनुभव घेतला आहे. गेल्यावेळीही आपण कोरोनावर नियंत्रण मिळवलं होतं. पण थोडीशी शिथिलता आली आणि कोविड चौपटीने वाढला, असं मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा- मी विरोधी पक्षनेत्यांप्रमाणे वैफल्यग्रस्त नाही, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला

मागच्या वेळच्या तुलनेत सध्याचा कोरोनाचा विषाणू फारच घातक आहे. हा विषाणू अत्यंत वेगाने पसरत असल्याने काही पटींमध्ये लोकं बाधित होत आहेत. गेल्या वेळची तुलना केल्यास आता परिस्थिती वाईट आहे. हे लक्षात घेतल्यानंतर पुढं जेव्हा कधी आपण निर्बंध शिथिल करु, तेव्हा मागील अनुभवातून आपल्याला शहाणं व्हावं लागेल. सुरक्षेचे नियम पाळावेच लागतील, असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

सध्या राज्यातील परिस्थिती आटोक्यात आली असून योग्य वेळी यासंबंधी निर्णय घेण्यात येईल, मात्र कोणीहा गाफील राहू नये. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्या सर्वांना नियम पाळावेच लागतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

कोरोनासोबतच महाराष्ट्रात म्युकरमायकोसीसचे रुग्णही मोठ्या प्रमाणात वाढतआहेत. तर दुसरीकडे या आजारावरील औषधं मिळण्यासही अडचणी येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी संयम दाखवावा, काळजी घ्यावी, असं आवाहन सातत्याने करण्यात येत आहे.

महाराष्ट्रात गुरूवारी २९९११ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली व नवीन ४७३७१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ५०२६३०८ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ३८३२५३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ९१.४३% झालं आहे.

(maharashtra cm uddhav thackeray hints to continue lockdown in june)

हेही वाचा- मुख्यमंत्र्यांचा केवळ 'दर्शनाचा कार्यक्रम', प्रविण दरेकरांची टीका

पुढील बातमी
इतर बातम्या