जनतेच्या विकासकामांच्या आड मी कुणालाही येऊ देणार नाही- उद्धव ठाकरे

राज्यात रस्तेबांधणीच्या कामात शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींकडून अडथळा आणला जात असल्याची तक्रार काही दिवसांपूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून केली होती. त्यावर नागपूर मेट्रो स्टेशनच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना कोणत्याही प्रकारे जनतेच्या विकासकामांच्या आड मी कुणालाही येऊ देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी गडकरींना दिली.

आपल्या भाषणात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, नितीनजी तुम्ही बोलता फार प्रेमात, पण पत्र कठोर लिहिता. तुमचं आणि आमचं नातं थोडं वेगळं आहे. तुम्हीही कर्तव्यकठोर आहात, आम्हीही कर्तव्यकठोर आहोत. आपल्याला कल्पना आहे की शिवसेना प्रमुखांची जी शिकवण आहे, ती आपणही घेतली आहे की जनतेशी कधीही गद्दारी करायची नाही. त्यांचा विश्वासघात करायचा नाही. जनतेच्या कामात अडथळा येऊ द्यायचा नाही. मी तुमच्या पत्राचा हलका-फुलका उल्लेख जरी केला असला, तरी मी तुम्हाला ग्वाही देतो, की कोणत्याही प्रकारे जनतेच्या विकासकामांच्या आड मी कुणालाही येऊ देणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी गडकरी यांना दिलं. 

हेही वाचा- अडवण्याची भाषा करणारे ‘गोमूत्र’वर आले, राणे बंधूंचं शिवसेनेला प्रत्युत्तर

काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं होतं. या पत्रातून शिवसेनेच्या नियमबाह्य कामामुळे आणि दहशतीमुळे रस्त्याची कामं बंद पडतील, असा थेट इशाराच त्यांनी दिला होता. प्रामुख्याने वाशिम जिल्ह्यातील रस्ते कामांना स्थानिक शिवसेना आमदार-खासदारांकडून विरोध होत असल्याचं गडकरी यांनी पत्रात म्हटलं होतं.

केंद्राच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयातर्फे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय महामार्गावरील प्रकल्प मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यापैकी बरेच प्रकल्प पूर्णत्वास आलेले असून, काही प्रगतीपथावर आहेत. मात्र अनेक प्रकल्पांच्या कामांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी अडचणी आणत असल्याचे माझ्या निदर्शनास आलेलं आहे. विविध प्रकारच्या नियमबाह्य मागण्यांनी अधिकारी आणि कंत्राटदारांना भंडावून सोडणे आणि त्यांनी न ऐकल्यास कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन काम बंद पाडण्यापर्यंत या लोकप्रतिनिधींची मजल गेली आहे. विशेषतः वाशिम जिल्ह्यात हे प्रामुख्याने घडत आहे, असं नमूद करत त्यांनी संबंधित प्रकल्पांची माहिती दिली होती.

हेही वाचा- न्यायपालिकेची स्वतंत्रता धोक्यात घालण्याचं काम कोणाच्या इशाऱ्यावर?- नाना पटोले

पुढील बातमी
इतर बातम्या