कोरोना लढ्यात राजकारण आणू नका- उद्धव ठाकरे

(File Image)
(File Image)

संपूर्ण देश कोविडशी लढत असताना महाराष्ट्र देखील कुठेही मागे नव्हता आणि नाही हे ठामपणे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी देशातील सर्व पक्षांच्या नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करून, या लढ्यात कुठलेही राजकारण आणू नये म्हणून सांगावं, अशी मागणी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत महाराष्ट्राची बाजू मांडली.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की, गेल्या वर्ष सव्वा वर्षांपासून आपल्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कोविडची लढाई लढतो आहोत. मधल्या काळात तर संसर्गाची लाट थोपविण्यात आपल्याला यशही आलं होतं. महाराष्ट्रात तर अडीच ते ३ हजार रुग्णच आढळत होते. इतर सर्व प्रमुख राज्यांसारखीच महाराष्ट्राने (maharashtra) देखील काळजी घेतली होती. मात्र ग्रामपंचायत निवडणुका, लग्न समारंभ या दरम्यान साथ वाढली. 

काळजी घेऊनही वाढ

अचानक विदर्भाच्या काही भागातून विषाणूचा (coronavirus) उद्रेक सुरू झाला व कुटुंबच्या कुटुंब संसर्गग्रस्त झाली. राज्य सर्वसामान्य परिस्थितीत परतत असताना विषाणूच्या म्युटेशनमुळे संसर्ग वाढीस लागला. इतर जगातही असंच होत होतं. त्यामुळे महाराष्ट्राने काळजी घेऊनही ही भयंकर वाढ झाली ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्रात आरटीपीसीआर चाचण्या ७० टक्यांपेक्षा जास्त करु व लसीकरण आणखी जास्त गतीने वाढवू. मात्र त्यासाठी केंद्राचं सहकार्य  मिळावं, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा- सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा पुन्हा बंद होणार?

महाराष्ट्राकडे खूप कमी साठा

प्राधान्यक्रम गटातील सुमारे १.७७ कोटी जनतेचं लसीकरण करण्याचं उद्दिष्ट असून त्यासाठी दर आठवड्यात ४० लाख लसींचा पुरवठा करावा. आत्तापर्यंत राज्याला १ कोटी ६ लाख २३ हजार ५०० डोस मिळाले आहेत. आजपर्यंत ९२  ते ९५ लाख डोस देण्यात आले आहेत. या घडीला महाराष्ट्राकडे खूप कमी साठा असून काही केंद्र बंद पडली आहेत. 

१५ एप्रिलनंतर १७.४३ लाख डोस देण्यात येतील, असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं. मात्र त्यामुळे लसीकरण मोहिमेत खंड पडेल. त्यामुळे आमच्या मागणीप्रमाणे एकदमच पूर्ण वितरण व्हावं. २५ वर्षापुढील सर्वांना लसीकरण गरजेचं आहे. या मागणीचा पुनरुच्चार देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला.

हाफकिनला लस उत्पादन परवानगी मिळावी

हाफिकिन बायो फार्मास्युटिकल कॉर्पोरेशन लि. परळ इथं कोव्हॅक्सिनचं उत्पादन  करण्यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव पाठवला आहे. तो लवकर मान्य झाल्यास तंत्रज्ञान हस्तांतर प्रक्रियेने दरवर्षी २२८ दशलक्ष डोस तयार करण्यात येतील व लसीकरण मोहिमेला वेग येईल, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा- मुंबईत अवघ्या एका दिवसाचा लशीचा साठा शिल्लक- महापौर किशोरी पेडणेकर

पुढील बातमी
इतर बातम्या