परप्रांतीय कामगारांची यादी बनवा, मुख्यमंत्र्यांच्या प्रशासनाला सूचना

निवारा केंद्रात आश्रयाला असलेल्या परप्रांतीय कामगारांची यादी तयार करून ठेवा. जेणेकरून मुंबई, ठाणे आणि पुण्यातून विशेष रेल्वे सुरू करण्याची परवानगी मिळाल्यास त्यांना त्वरीत पाठवता येईल, असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मंत्रालयातील सचिव, पोलीस अधिकारी यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. 

हेही वाचा - तूर्तास, मुंबईतून मजुरांसाठी एकही ट्रेन सुटणार नाही, राज्य सरकारने केलं स्पष्ट

केंद्र सरकारने देशात ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ गावी परतण्याची परवानगी दिली आहे. केंद्र सरकारच्या परवानगीनंतर परप्रांतीयांना रवाना करण्यासाठी जिल्हा पातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. महाराष्ट्रातील काही शहरांतून विशेष श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून परप्रांतीयांना रवाना केलं जात आहे. परंतु  मुंबई, ठाणे, पुण्यात कंटेन्टमेंट झोन असल्यामुळे मुंबईतून बाहेरगावी जाणाऱ्या मजुरांसाठी कोणतीही रेल्वे सोडण्यात येणार नसल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे.

असं असलं तरी, निवारा केंद्रातील सर्व कामगारांची यादी अद्ययावत करावी. जेणेकरून आज ना उद्या मुंबई, ठाणे, पुणे येथून विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय झाल्यास या कामगारांच्या प्रवासाचं व्यवस्थित नियोजन जिल्हाधिकारी तसंच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना करता येईल, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

राज्यांतर्गत ठिकठिकाणी अडकलेल्या व्यक्तींच्या गटांना त्या-त्या जिल्ह्यांत जाण्याची परवानगी ही सर्व बाबींचा विचार करून व लाॅकडाऊनच्या नियमाप्रमाणे करावी. अडकलेल्या व्यक्ती हे परप्रांतीय असले, तरी परिस्थितीमुळे त्यांना थांबावे लागलं, त्यादृष्टीने याकडे पहावं. घरी परतणाऱ्या परराज्यातील मजूर, कामगारांकडून मानवतेच्या दृष्टीने रेल्वेने तिकीट न आकारण्याची विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला केली.

हेही वाचा - मध्य प्रदेशातील मजुरांच्या मदतीला काँग्रेस आली धावून, प्रवासाचा संपूर्ण खर्च उचलणार
पुढील बातमी
इतर बातम्या