Advertisement

तूर्तास, मुंबईतून मजुरांसाठी एकही ट्रेन सुटणार नाही, राज्य सरकारने केलं स्पष्ट

मुंबईमध्ये कंटेन्टमेंट झोन असल्यामुळे मुंबईतून बाहेरगावी जाणाऱ्या मजुरांसाठी कोणतीही रेल्वे सोडण्यात येणार नसल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे.

तूर्तास, मुंबईतून मजुरांसाठी एकही ट्रेन सुटणार नाही, राज्य सरकारने केलं स्पष्ट
SHARES

केंद्र सरकारच्या नव्या आदेशानुसार ४ मे २०२० पासून परराज्यात राहणाऱ्यांना आपापल्या गावी जाण्याची सशर्थ परवानगी देण्यात आलेली आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील काही शहरांतून विशेष श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून परप्रांतीयांना रवाना केलं जात आहे. परंतु  मुंबईमध्ये कंटेन्टमेंट झोन असल्यामुळे मुंबईतून बाहेरगावी जाणाऱ्या मजुरांसाठी कोणतीही रेल्वे सोडण्यात येणार नसल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे.

नाशिकहून ८४७ परप्रांतीय रवाना

केंद्र सरकारने देशात ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ गावी परतण्याची परवानगी दिली आहे. केंद्र सरकारच्या परवानगीनंतर परप्रांतीयांना रवाना करण्यासाठी जिल्हा पातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार सर्वात पहिल्यांदा शनिवार २ मे रोजी नाशिकहून विशेष श्रमिक ट्रेन रवाना करण्यात आली. ८४७ स्थलांतरीत मजुरांना घेऊन ही ट्रेन उत्तर प्रदेशमधील लखनऊला रवाना झाली. 

लाॅकडाऊन जाहीर झाल्यानंतर मुंबई आणि उपनगरांतून पायी उत्तर प्रदेशकडे निघालेल्या या मजुरांना इगतपुरी, नाशिक इथं थांबवून निवारागृहात त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. गेल्या दीड महिन्यापासून हे मजूर नाशिक शहरातील विविध निवारागृहात थांबलेले होते. या परप्रांतीय मजुरांमध्ये लिंबू पाण्याचा व्यवसाय करणारे, दूध विक्रेते, वडापावचे व्यावसायिक होते. 

हेही वाचा - महाराष्ट्रावर संकट येताच परप्रांतीय पळ काढतात, आपल्या मराठी तरूणांना संधी द्या- राज ठाकरे

भिवंडीतून ११०४ परप्रांतीय रवाना 

त्यानंतर रविवार ३ मे रोजी भिवंडी रोड रेल्वे स्टेशन इथून ११०४ मजुरांना घेऊन विशेष श्रमिक ट्रेन उत्तर प्रदेश राज्यातील गोरखपूरच्या दिशेने रात्री १ वाजता रवाना झाली. विशेष म्हणजे मजुरांनी सर्वच ठिकाणी गर्दी केल्याने विशेष श्रमिक ट्रेनचं बुकिंग काही वेळातच फुल झालं होतं. भोईवाडा पोलीस ठाणे २११, भिवंडी शहर पोलीस ठाणे ३९५, शांतीनगर पोलीस ठाणे ६७, नारपोली पोलीस ठाणे ४२२, कोनगाव पोलीस ठाणे १०५ अशा भिवंडीतील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एकूण १ हजार २०० कामगारांची गोरखपूरला जाण्यासाठी निवड करण्यात आली होती. मात्र, ९६ कामगार काही कारणांमुळे यातून वगळण्यात आले. आरोग्य विभागाकडून तपासणी करून या सर्व कामगरांना सोडण्यात आलं.

नागपूरहून ९७७ परप्रांतीय रवाना

याच पद्धतीने लॉकडाऊनमुळे नागपूर विभागात वेगवेगळ्या निवारागृहात असलेल्या ९७७ कामगारांना  घेऊन विशेष श्रमिक ट्रेन ३ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता नागपूरवरून लखनऊच्या दिशेने रवाना झाली. यामध्ये गडचिरोलीतील १०८, चंद्रपूर २८९, भंडारा १३३, वर्धा २२० आणि नागपूरमधील २२७ प्रवाशांचा समावेश होता. 

मुंबईतही मोठ्या संख्येने स्थलांतरीत मजूर याच पद्धतीच्या विशेष ट्रेनची वाट बघत आहेत. तूर्तास तरी मुंबईमध्ये कंटेन्टमेंट झोन असल्यामुळे मुंबईतून बाहेरगावी जाणाऱ्या मजुरांसाठी कोणतीही रेल्वे सोडण्यात येणार नसल्याचं सरकारने स्पष्ट केलं आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा