अर्थसंकल्पाने पुन्हा मरणाच्या वाटेवर नेऊन सोडलंय- अजित पवार

कोरोनावर लस शोधून देशातील शास्त्रज्ञांनी जनतेला जीवनदान दिलेलं असताना, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पानं देशातील जनतेला पुन्हा एकदा मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवल्याची तिखट प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (ajit pawar) यांनी दिली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोमवारी देशाचा २०२१-२०२२ सालचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. त्यासंदर्भात प्रसारमाध्यमांनी अजित पवार यांना विचारलं असता, ते म्हणाले, या अर्थसंकल्पामुळे  दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपासून ते कोरोनाकाळात रोजगार गमावलेल्या कोट्यवधी युवकांच्या पदरी निराशा पडली आहे. 

केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्यांक बांधवांवर अन्याय करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. या अर्थसंकल्पात महिलांसाठी कुठलीही भरीव तरतूद करण्यात आलेली नाही की आधीच अडचणीत असलेल्या करदात्यांना दिलासा दिलेला नाही. देशाच्या तिजोरीत सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्रावर यावेळीही अन्याय झाल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. 

हेही वाचा- पेट्रोल-डिझेल हजार रुपयांवर न्यायचंय का? संजय राऊतांचा टोला

नाशिक-नागपूर महापालिकेच्या निवडणुका येऊ घातल्याने नाशिक मेट्रोसाठी २०९२ कोटी तर, नागपूर मेट्रोसाठी ५९७६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्ग, नाशिक-पुणे, कराड-चिपळूण रेल्वेमार्गासाठी तरतूद केल्याचं या घडीला तरी दिसून येत नाही. रेल्वे अर्थसंकल्प आणि सर्वसाधारण अर्थसंकल्प एकत्रित करुन, केंद्रानं आपलं अपयश, अकार्यक्षमता लपवण्याची सोय आधीच करुन ठेवली आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली.

भारत-ऑस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यांवर अर्थमंत्री बोलल्या. क्रिकेटचा सामना नशिबानं साथ दिल्यास एकवेळ जिंकता येतो, परंतु देशाच्या अर्थसंकल्पारखी गोष्ट नशिबावर सोडून चालणार नाही, हे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी समजून घ्यायला हवं होतं. केंद्रीय अर्थसंकल्प हे आत्मनिर्भर बजेट असल्याचा ट्रेंड ट्विटरवर चालवला जातोय, परंतु हे आत्मनिर्भर नव्हे तर देशाला बरबादीकडे नेणारं अस्ताव्यस्त बजेट असल्याची टीका अजित पवार यांनी केली.

(maharashtra deputy cm ajit pawar reaction on union budget 2021)

हेही वाचा- Budget 2021: जुन्या गाड्या भंगारात निघणार, वाचा, सरकारची नवी पाॅलिसी आहे तरी काय?
पुढील बातमी
इतर बातम्या