केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी देशाचा अर्थसंकल्प (२०२१-२२) सादर करताना पेट्रोल आणि डिझेलवर अधिभार लावण्याची घोषणा केली. पेट्रोल-डिझेलच्या किंमती आधीच सातत्याने वाढत असताना त्यात आणखी अधिभार लावून सरकारला या किंमती हजार रुपयांवर नेऊन ठेवायच्या आहेत का? असा प्रश्न शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे.
कोरोना संकट आणि लाॅकडाऊनमुळे सरकारी तिजोरीला मोठी झळ बसली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सरकारची तिजोरी भरण्यासाठी कृषी क्षेत्राच्या नावाने वेगळा फंड तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. या माध्यमातून पेट्रोल-डिझेल आणि मद्य आणि अल्कोहोलयुक्त पेयांवरील सेस वाढवण्यात आला आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हा कृषी अधिभार लावण्यात येत असल्याचं अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा- Budget 2021: जुन्या गाड्या भंगारात निघणार, वाचा, सरकारची नवी पाॅलिसी आहे तरी काय?
पेट्रोलवर २.५ रुपये आणि डिझेलवर ४ रुपये सेस लावण्यात येणार आहे. मात्र हा सेस ब्रँडेड पेट्रोल-डिझेल म्हणजेच स्पीड, एक्स्ट्रा माईल अशा प्रीमिअम इंधनावर लागणार आहे. त्यामुळे हा सेस ग्राहकांना नाही, तर इंधन कंपन्यांना द्यावा लागणार असल्याचं सांगितलं जात आहे. या दरवाढीचा परिणाम सामान्यांच्या खिशावर होणार नाही असं देखील म्हटलं जात आहे. सध्या मुंबईत पेट्रोल ९२.८६ आणि डिझेल ८३.३० रुपये लीटर आहे.
त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राची निराशा झाली आहे. मी या अर्थसंकल्पात महाराष्ट्र शोधण्याचा प्रयत्न करतोय. पण, बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काहीही विशेष तरतूद नाही. संपूर्ण बजेटचा भार महाराष्ट्रावर अवलंबून आहे. महाराष्ट्रानं देशाला देण्याची दानत दाखवली आहे. महाराष्ट्रावर मात्र नेहमीच अन्याय होत आलेला आहेत. अर्थमंत्री देत असलेले आकडे किती खरे आणि किती खोटे? हे सहा महिन्यात कळेल. त्यामुळे आता आर्थिक थापा बंद करायला हव्यात.
सादर झालेलं बजेट हे देशाचं होतं की पक्षाचं निधीवाटप होतं? हेच कळत नसून पेट्रोल-डिझेलवर अधिभार लावून त्यांना पेट्रोल- डिझेल हजार रुपये करुन लोकांना कायमचं मारायचं असेल. आधी लॉकडाऊनमुळं लोकं घरात होते आता पेट्रोलमुळे लोकांना प्रवास करता येणार नाही. लोकांनी कायमचं घरीच बसावं हरी भजन करत, असं बहुतेक सरकारला वाटत असेल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
(shiv sena mp sanjay raut reaction on union budget 2021)
हेही वाचा- एटीएम लुटण्याचा प्रयत्न पोलिसांमुळे अयशस्वी