Ganesh Festival 2020: चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी गावी जाता येईल, पण…

गणेशोत्सवासाठी गावी जाण्यासाठी चाकरमान्यांनी तयारी सुरू केली आहे. परंतु ठराविक तारखेनंतर चाकरमान्यांना जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही, असं वृत्त पसरल्यानंतर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील चाकरमान्यांमध्ये कमालिची अस्वस्थता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांनी चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणातील गावी जाण्यास निश्चितच परवानगी देण्यात येईल. परंतु कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी काही नियम व अटी निश्चित करण्यात येणार असून त्यावर मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम असेल, अशी माहिती दिली.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये तसंच कोकणातील नागरिकांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन उत्सव साजरा करता यावा यावर चर्चा करण्यासाठी अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली नवीन प्रशासकीय इमारत इथं बुधवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री आदिती तटकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार विनायक राऊत, खासदार राजन विचारे, खासदार सुनील तटकरे  तसंच मुंबई-कोकणातील आमदार उपस्थित होते.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी एक बैठक घेतली होती. या बैठकीत गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या चाकरमान्यांना ७ ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर प्रवेशबंदी असेल, या सह अनेक जाचक अटीं ठरवण्यात आल्या होत्या. यासंबंधीच्या इतिवृत्ताची माहिती पसरताच चाकरमान्यांकडून संताप व्यक्त होऊ लागला. तसंच राजकारणही तापू लागल्याने सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या निर्देशानंतर दुसऱ्याच दिवशी हे इतिवृत्त रद्द करण्यात आलं. शिवाय कोरोनाचं संकट असलं, तरी यावर्षी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना कोणत्याही स्वरूपाचा विरोध नाही. त्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास प्रशासन कटिबद्ध आहे, असा खुलासाही उदय सामंत यांनी केला. 

हेही वाचा - Ganesh Festival 2020: गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना विरोध नाही

या सर्व पार्श्वभूमीवर अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एकदा बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्य शासनाने चाकरमान्यांबाबत लवकरात लवकर अंतिम निर्णय घ्यावा व नियमावली निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली. गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या क्वारंटाईनचा कालावधी १४ ऐवजी ७ दिवसांचा करावा, त्यानंतर ते पुढील ३ दिवस गर्दीत मिसळणार नाहीत, चाकरमान्यांना ई-पास सुलभरित्या मिळावा, खासगी वाहनांना टोलमाफी मिळावी, खासगी वाहन नसलेल्यांसाठी एसटी बस उपलब्ध कराव्यात, चाकरमान्यांची निघायच्या ४८ तास आधी मोफत किंवा स्वस्त दरात कोरोना तपासणी व्हावी अशा मागण्याही बैठकीत करण्यात आल्या.

या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनिल परब म्हणाले की, चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी सरकार घेणार आहे. या बैठकीचा तपशील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात येणार आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियम व अटींचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. गणेशोत्सवासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात विशेष रेल्वे तसंच एसटी बस सोडल्या जातात. यंदा रेल्वे गाड्यांची शक्यता नसली, तरी परवानगी मिळाल्यास चाकरमान्यांसाठी विशेष एसटी बसेस सोडल्या जातील, असं परब यांनी स्पष्ट केलं.

शिवाय निसर्ग चक्रीवादळामुळे खंडीत झालेला वीजपुरवठा गणेशोत्सवाआधी सुरळीत करण्यात येईल, असं आश्वासनही परब यांनी दिलं.

हेही वाचा - Ganesh Chaturthi 2020: यंदा गणेशोत्सवच नाही; 'लालबागचा राजा' मंडळाचा ऐतिहासिक निर्णय
पुढील बातमी
इतर बातम्या