पेपरफुटी करणारे क्लास होणार "ब्लॅकलिस्ट"

दहावी आणि बारावीच्या ज्या परीक्षा केंद्रांवर पेपर फुटत आहेत, अशा शाळांना, परीक्षा केंद्रांना काळ्या यादीत टाकण्यात येईल. त्याचसोबत ज्या खाजगी कोचिंग क्लासची नावे पेपरफुटीच्या प्रकरणात येतील त्यांनाही काळ्या यादीत टाकण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली.

विधान परिषदेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे पेपर फुटीचा प्रश्न चर्चेला आला. काँग्रेसचे सदस्य संजय दत्त यांनी उल्हासनगर येथील एका परीक्षा केंद्रावर साेमवारी इंग्रजी माध्यमाचा हिस्ट्री पाॅलिटिकल सायन्सचा पेपर फुटल्याकडे सभागृहाचं लक्ष वेधलं. अशा घटनांमुळे शिक्षण विभागाच्या, बोर्डाच्या कामकाजावर प्रशचिन्ह उभे राहिल्याचं दत्त यांनी सांगितलं.

कोचिंग क्लासने पुरवला पेपर

पेपरफुटी प्रकरणात कोचिंग क्लासच्या शिक्षकांनीच मुलांना पेपर दिल्याची माहितीही त्यांनी दिली. सरकारसाठी हा 'वेक अप कॉल' असून त्यांनीच योग्य वेळी पावलं उचलावीत, असा सल्लाही त्यांनी दिला.

लोकप्रतिनिधींची मध्यस्ती

यावर उत्तर देताना शिक्षणमंत्री तावडे म्हणाले, ''काही कोचिंग क्लासवाले पास करण्याचं आश्वासन देऊन अॅडमिशन घ्यायला सांगतात. या अनुषंगाने उल्हासनगरच्या घटनेचा तपास सुरू आहे. आणखी ज्या केंद्रांवर पेपर फुटत आहेत, अशी केंद्र काळ्या यादीत टाकण्याचे काम करण्यात येत आहे. मात्र याप्रकरणी काही लोकप्रतिनिधी मध्यस्थी करत असल्याने कारवाई करण्यात अडचणी येत आहेत.

तरी याप्रकरणी संबंधित लोकप्रतिनिधिंची बैठक घेऊन अशी केंद्र काळ्या यादीत टाकण्यासाठी त्वरीत पावलं उचलण्यात येतील, अशी माहिती तावडे यांनी दिली. यासोबतच पेपरफुटीची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असंही तावडे म्हणाले.


हेही वाचा-

बारावी 'केमिस्ट्री'चा पेपर व्हॉट्सअॅपवर, अल्पवयीन मुलांसह चौघांना अटक


पुढील बातमी
इतर बातम्या