महाराष्ट्रात राहून गुजरात मॉडेलच्या गप्पा मारणाऱ्यांनो, जरा गुजरातमध्ये जाऊन त्यांना 'महाराष्ट्र पॅटर्न' (maharashtra housing minister jitendra awhad criticised bjp over covid 19 death rate in gujrat) काय आहे तो दाखवून खरा महाराष्ट्रधर्म पाळा, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा १ लाखांच्या वर जाऊन पोहोचल्याने सध्या विरोधकांकडून सातत्याने सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. केवळ राज्यातच नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवरूनही भाजपच्या नेत्यांकडून राज्य सरकारच्या अपयशाकडे बोट दाखवण्यात येत आहे. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी देखील याच मुद्द्यावरून भाजपला प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली आहे. विशेषकरून भाजपची सत्ता असलेल्या गुजरातमधील परिस्थिती कोरोनामुळे किती बिघडली आहे, हे दाखवण्याचा आव्हाड प्रयत्न करत आहेत.
आपल्या ट्विटमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृत्यूदराचा उल्लेख करताना जितेंद्र आव्हाड म्हणतात की, गुजरातचा कोविड-१९ मृत्यूदर हा ६.२५ टक्के असून महाराष्ट्रात ३.७३ टक्के इतका आहे. तेव्हा महाराष्ट्रात राहून गुजरात मॉडेलच्या गप्पा मारणाऱ्यांनो, जरा गुजरातमध्ये जाऊन त्यांना 'महाराष्ट्र पॅटर्न' काय आहे तो दाखवून खरा महाराष्ट्रधर्म पाळा, असा खोचक सल्ला त्यांनी महाराष्ट्रातील विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांना दिला आहे.
हेही वाचा - ‘हा’ साधा चावटपणा नसून भलामोठा कट- जितेंद्र आव्हाड
त्याआधी महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून आजपर्यंतचा १ लाखाचा आकडा आवर्जून सांगतात. पण त्यातील ५० हजार पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत हे सांगायचं आवर्जून टाळतात. हा साधा चावटपणा नाही, हा भलामोठा कट आहे. गुजरातचा मृत्यूदर सांगा की! असं आव्हान जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेत्यांना दिलं होतं.
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या सोमवारी १ लाख १० हजार ७४४ वर जाऊन पोहोचली आहे. तर दिवसभरात १७८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर ५०.६१ टक्के एवढा झाला असून एकूण ॲक्टीव्ह रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता (५६ हजार ४९) जास्त झाली आहे.
सद्यस्थितीत राज्यात ५ लाख ८९ हजार १५८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात १५४७ संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ८० हजार ६७० खाटा उपलब्ध असून सध्या २८ हजार ८४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.