सुरक्षा कपातीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी तर...

राज्य सरकारने नुकतीच माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis), मनसे अध्यक्ष राज ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप खासदार नारायण राणे यांच्यासह अनेक भाजप नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री झाल्यानंतर मला सुरक्षा मिळाली होती. याकूब मेमन आणि नक्षलवादी कारवायांनंतर केंद्र सरकारनं दिलेल्या निर्देशांच्या आधारे माझी सुरक्षा वाढवण्यात आली होती. मात्र आता मला असलेला धोका कमी झाल्याचं राज्य सरकारला वाटतं असेल. म्हणूनच त्यांनी माझी सुरक्षा कमी केली असावी, असं देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

राजकीय नेत्यांना सुरक्षा देण्याबाबत एक पद्धत असते, आम्ही या पद्धतीनुसारच निर्णय घेत होतो. परंतु सद्यस्थित ज्यांना गरज नाही, अशा नेत्यांनाही सरकारकडून मोठ्या प्रमाणात सुरक्षा देण्यात येत आहे. पण माझी यावर कोणतीही तक्रार नाही. सरकारने माझी सुरक्षा कमी केली म्हणून मी फिरणं थांबवणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

हेही वाचा- देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, राणेंसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेत कपात

देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेसाठी असलेली बुलेटप्रुफ गाडी राज्य सरकारने काढून घेतली आहे. फडणवीस यांची झेड प्लस सुरक्षा काढून त्यांना एस्कॉर्टसह वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांची झेड सुरक्षा काढून त्यांना वाय प्लस एस्कॉर्टसह देण्यात आली आहे. खासदार नारायण राणे यांची वाय प्लस सुरक्षा रद्द करण्यात आली आहे. तर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना एस्कॉर्ट शिवाय सुरक्षा देण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना वाय प्लस एस्कॉर्टसह सुरक्षा देण्यात आली होती. ही सुरक्षा काढून त्यांना एक्स सुरक्षा देण्यात आली आहे. दिविजा फडणवीस यांचीही वाय प्लस एस्कॉर्टसह सुरक्षा काढून एक्स सुरक्षा देण्यात आली आहे. तसंच दीपक केसरकर यांची वाय प्लस सुरक्षा काढून वाय, आशिष शेलार आणि राम नाईक यांची वाय प्लस सुरक्षा काढून त्यांना वाय सुरक्षा देण्यात आली आहे. 

(maharashtra opposition leader devendra fadnavis reacts on z plus security cut by state government)

हेही वाचा- मराठा आरक्षण सुनावणीवर दिल्लीत बैठक

पुढील बातमी
इतर बातम्या