मनमोहन सिंग अशा प्रकारे देणार PMC बँक खातेदारांना दिलासा

“पीएमसी बँकेसोबत जे काही झालं ते दुर्दैवी आहे. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, केंद्रीय अर्थमंत्री आणि पंतप्रधानांना या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती करेन. तसंच काँग्रेस पक्षातर्फे संसदेतही याप्रकरणी आवाज उठवण्यात येईल,” असं म्हणत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पंजाब आणि महाराष्ट्र को-आॅपरेटीव्ह बँक (PMC) खातेदारांच्या शिष्टमंडळाला दिलासा दिला.   

पीएमसी बँक खातेधारकांच्या १५ जणांच्या शिष्टमंडळाने गुरूवारी मनमोहन सिंग यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी त्यांनी आपली अडचण त्यांच्यासमोर मांडून या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली.

शिष्टमंडळाची भेट

त्यावर शिष्टमंडळाला दिलासा देताना मनमोहन सिंग म्हणाले की, “हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मी त्यावर जास्त भाष्य करणार नाही. परंतु बँक ग्राहकांची अडचण सोडवण्यासाठी महाराष्ट्र तसंच केंद्र सरकार आणि आरबीआयने एकत्र येऊन मार्ग काढला पाहिजे असं मला वाटतं. काहीजणांचा धक्क्याने मृत्यू झाल्याचं मला कळलं आहे. त्यामुळे मी अर्थमंत्री, पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना भेटून या प्रकरणात त्वरीत लक्ष घालण्याची विनंती करेन.,”  

न्यायालयीन कोठडी 

दरम्यान पीएमसी घोटाळ्याप्रकरणी बँकेचे निलंबित माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तर दुसरे माजी संचालक सुरजीत सिंह अरोरा यांना २२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आरोरा यांना काल आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती.


हेही वाचा-

काँग्रेस सावरकरविरोधी नाही- मनमोहन सिंग

पीएमसी बँक घोटाळा : आरोपी सुरजितसिंग, जाॅय थाॅमसला 'इतक्या' दिवसांची कोठडी


पुढील बातमी
इतर बातम्या