मराठा मोर्चाचा 'क्रांतीदिनी' पुन्हा एल्गार!

मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असून सर्व मराठा नेत्यांसोबत चर्चा करण्यासाठी आपण तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका बाजूला बोलत असले, तरी मराठा क्रांती मोर्चानं आता चर्चा कसली, आम्ही समोर ठेवलेल्या मागण्या आधी मान्य करा, असं म्हणत ९ आॅगस्टला क्रांती दिनी राज्यस्तरीय बंदची पुन्हा एकदा हाक दिली आहे. लातूर इथं झालेल्या राज्य स्तरीय बैठकीनंतर मराठा मोर्चाच्या प्रमुख समन्वयकांनी ही घोषणा केली. या दरम्यान महाराष्ट्रात कुठलेही व्यवहार होणार नाहीत, शाळा-महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयं मराठा समाज बंद पाडतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

नेमकी चर्चा कुणासोबत?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खा. नारायण राणे यांनी रविवारी मराठा मोर्चातील काही प्रतिनिधींसोबत सह्याद्री अतिथीगृह इथं गुप्त चर्चा केली. पण या बैठकीत नेमके कोणते आंदोलक प्रतिनिधी उपस्थित होते हा मोठा प्रश्न मराठा क्रांती मोर्चासह सर्वांना पडला. कारण ज्यांनी हे आंदोलन तीव्र केलं, असे मराठा आंदोलनातील सर्व आंदोलक परळीत ठिय्या आंदोलनात होते, तर उर्वरीत लातूरमधील राज्यस्तरीय बैठकीत होते. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी नेमकी कुणाशी चर्चा केली? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

काहीही संबंध नाही

त्यानंतर लातूरमधील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ज्या कुणा आंदोलकांशी चर्चा केली त्यांच्याशी आपला काहीही संबंध नसल्याचं जाहीर करत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीची प्रमुख समन्वयकांनी हवाच काढून घेतली आहे. आमच्या मागण्या आम्ही आधीच सरकारपर्यंत पोहोचवल्या आहेत. त्यामुळे आता चर्चा नाही, मध्यस्थी नाही, चर्चेला कुणी गेलं तर ते खपवून घेणार नाही असा धोरणात्मक निर्णय घेत तसा ठराव मंजूर केल्याचंही मराठा क्रांती मोर्चानं जाहीर केलं आहे.

महाराष्ट्र ठप्प करणार

महाराष्ट्रातील प्रत्येक आमदार आणि खासदारांच्या घरासमोर १ आॅगस्ट ते ८ आॅगस्टपर्यंत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देत ९ आॅगस्टला महाराष्ट्र ठप्प करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे.

आंदोलकांना हवी नुकसान भरपाई

आत्मबलिदान करणाऱ्या तिन्ही आंदोलकांच्या नातेवाईकांना ५० लाखाची आर्थिक मदत, एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याच्या मागणीचा ठरावही यावेळी मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर तिघांच्याही मृत्यूची आणि त्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीची न्यायालयीन चौकशी, एसआयटी चौकशी करत दोषींविरोधात गुन्हे दाखल करत त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचीही मागणीचा ठरावही या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.

असहकार आंदोलन

क्रांती दिनी आम्ही शाळा-महाविद्यालय बंद करू, शासकीय कार्यालयेही बंद पाडू. सर्व प्रमुख रस्ते, महामार्ग रोखून धरू, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत मराठा समाज यापुढं शेतसारा भरणार नाही, पाणीबिल आणि वीजबिल भरणार नाही, सरकारशी पूर्णपणे असहकार पुकारण्यात येईल, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक संजीव भोर पाटील यांनी दिली.


हेही वाचा-

मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार- मुख्यमंत्री

मराठा आरक्षण : अहवाल येताच विशेष अधिवेशन बोलवणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा


पुढील बातमी
इतर बातम्या