मराठा क्रांती मोर्चाचा 'रोखठोक' निर्णय, विधानसभेच्या सर्व जागा लढवणार

मराठा समाजाला आरक्षण मिळालं असलं, तरी अजून अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यामुळे नाराज मराठा क्रांती ठोक मोर्चाने इतर नेत्यांवर अवलंबून न राहता स्वत:च निवडणुकीच्या रिंगणात उतरून आपले प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेतला आहे. 

त्यानुसार मराठा क्रांती ठोक मोर्चा येत्या विधानसभा निवडणुकीत सर्वच्या सर्व २८८ जागा लढवणार असल्याची माहिती मराठा मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.  

प्रवेश प्रक्रियेत गोंधळ 

मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं असलं, तरी अजूनही मराठा समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेच्या गोंधळाला सामाेरं जावं लागत आहे. नोकरीपासून इतर अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचं नावं घेत हे सरकार सत्तेवर आलं. परंतु सत्तेवर आल्यावर या सरकारला मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. सत्ताधारी असोत किंवा विरोधक सगळे एकाच माळेचे मणी असल्याचंही पाटील म्हणाले.    

राजकीय वापर

आरक्षणाचं गाजर दाखवून सर्वच राजकीय पक्षांनी मागील ३० वर्षांपासून मराठा समाजाचा वापर करून घेतला आहे. केंद्रात किंवा राज्यात बसलेले मराठा लोकप्रतिनिधीही मराठा समाजाच्या मागण्यांचा पाठपुरावा करत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच आम्ही मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे येत्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करणार असल्याची माहिती मोर्चाकडून देण्यात आली. 

 


हेही वाचा-

मिलिंद देवरा यांचं मुंबई अध्यक्षपद कायम? २ कार्याध्यक्षही मिळण्याची शक्यता

शिवाजी मंडईतील मासे विक्रेत्यांचं स्थलांतर नाही, महापालिका आयुक्तांचं राज ठाकरेंना आश्वासन


पुढील बातमी
इतर बातम्या