मराठा क्रांती मोर्चाचा राज्यभर जेलभरो

मराठा क्रांती मोर्चाने आरक्षणाच्या मागणीसाठी जेलभरो आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार मुंबईसह राज्यभरात ठिकठिकाणी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. यासंदर्भात 9 आॅगस्टपर्यंत सरकारने निर्णय जाहीर करावा, नाहीतर मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आलं आहे.

11 वाजतापासून आंदोलन

काकासाहेब शिंदे या तरुणाच्या मृत्यूनंतर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक आक्रमक झाले. त्यानंतर आज प्रत्येक जिल्ह्यात जिल्हानिहाय जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. मुंबईच्या आझाद मैदान येथे सार्वत्रिक जेलभरो आंदोलन करण्यात येईल. सकाळी 11 वाजता या आंदोलनाला सुरुवात होईल.

नाहीतर पुन्हा उद्रेक

मराठा क्रांती मोर्चातील आंदोलकांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत, कळंबोलीत महिलांवर केलेला लाठीचार्ज, गोळीबार यासंदर्भात सदर अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावं, मराठा आरक्षणासाठी ज्यांचा बळी गेला त्या कुटुंबिलाया 50 लाख रुपये आणि जखमींना 10 लाख रुपये द्यावेत या मागण्यांसाठी या आंदोलनाची हाक दिली आहे. हे आंदोलन शांततेच्या मार्गाने होईल. मात्र सरकारने योग्य निर्णय घेतला नाहीतर पुन्हा उद्रेक होईल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी दिला आहे.

२ वर्षांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज मूक मोर्चाद्वारे आंदोलन करत आहे. तर दुसरीकडं न्यायालयीन लढाईही लढत आहे. पण २ वर्षानंतरही तोडगा निघत नसल्याने राज्यभरात मराठा आंदोलनाचा वणवा पेटला.


हेही वाचा - 

हिंसा नको चर्चा करा- मुख्यमंत्री

मराठा मोर्चाचा 'क्रांतीदिनी' पुन्हा एल्गार!

पुढील बातमी
इतर बातम्या