Advertisement

कळंबोलीतील उद्रेकानंतर 'मराठा क्रांती मोर्चा'चा मुंबई बंद स्थगित!

मुंबई बंद आंदोलनादरम्यान कळंबोलीत पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्या, ठाण्यातील नितीन कंपनीजवळ पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, तर मानखुर्दमध्ये बेस्टची बस जाळण्याचा प्रयत्न झाला. या हिंसक घटनानंतर मात्र दुपारी अडीच्यादरम्यान मराठा क्रांती मोर्चानं मुंबई बंद स्थगित केला.

कळंबोलीतील उद्रेकानंतर 'मराठा क्रांती मोर्चा'चा मुंबई बंद स्थगित!
SHARES

सकाळपासून मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगडमध्ये शांततेत सुरू असलेलं मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन दुपारनंतर भडकू लागलं. त्यातच कळंबोलीमध्ये आंदोलनकर्त्यांनी आक्रमक होत पोलिसांच्या गाड्या जाळून दगडफेक करताच मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी हा बंद मागे घेण्याचा निर्णय तडकाफडकी जाहीर केला.

कळंबोलीत पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्या, ठाण्यातील नितीन कंपनीजवळ पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, तर मानखुर्दमध्ये बेस्टची बस जाळण्याचा प्रयत्न झाला. या हिंसक घटनांनंतर दुपारी अडीच्यादरम्यान मराठा क्रांती मोर्चानं मुंबई बंद स्थगित केला. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विरेंद्र पवार यांनी पत्रकार परिषद घेत हा बंद स्थगित केल्याचं जाहीर केलं.



काय म्हणाले पवार?

मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळला असून राज्य सरकार मात्र या प्रश्नाकडं दुर्लक्ष करत आहे. गेल्या दोन वर्षांपासून शांततेत मूक मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाज आरक्षणाच्या प्रश्नावर लढत होता. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेजबाबदार वक्तव्य करत मराठा समजाच्या भावना दुखावल्या. त्यातच आंदोलकांना आत्मबलिदानासारखा टोकाचा निर्णय घ्यावा लागला. सरकारनं आमच्या हातात दगड दिला, काठ्या दिल्या. सरकारनं आम्हाला दगड, काठ्या मारण्यासाठी प्रवृत्त केल्याचं म्हणत पवार यांनी सर्व परिस्थितीला सरकार जबाबदार असल्याचं सांगितलं.


बंद मागील कारण काय?

औरंगाबादमध्ये आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूनंतर मराठा क्रांती मोर्चानं मंगळवारी मुंबई, पुणे, ठाणे, नवी मुंबई, पंढरपूर वगळत महाराष्ट्र बंदची हाक दिली. या बंदला राज्यभर हिंसक वळण लागलं. तर बुधवारी मराठा क्रांती मोर्चानं मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगड बंदची हाक दिली. यावेळी मराठा आरक्षणासह ७२ हजार पदांच्या मेगाभरतीच्या मागणीसह पंढरपूर वारीबाबत मुख्यमंत्र्यांनी जे वक्तव्य केलं त्याबाबत माफी मागावी नाही तर राजीनामा द्यावा या मागण्याही उचलून धरल्या.


सकाळी शांततेत...

मराठा क्रांती मोर्चाच्या बंदच्या हाकेनुसार सकाळी सात वाजल्यापासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरात बंदला सुरूवात झाली. मुंबईत सकाळपासूनच जनजीवन सुरळीत सुरू होतं. शाळा-महाविद्यालयं सुरू होती, तर रेल्वे, बेस्ट, मेट्रो, रिक्षा, टॅक्सी वाहतूक किरकोळ घटना वगळता सुरळीत सुरू होती.


दुपारपासून आंदोनाचा भडका

आंदोलकांनी रस्त्यावर उतरत दुकानं बंद करण्याचा, बस अडवण्याचा प्रयत्न केला. पण मुंबईत मात्र बंदचा कोणताही परिणाम दिसून आला नाही. त्याचवेळी ठाणे आणि नवी मुंबईत बंदला हिंसक वळण लागलं. विविध महामार्गांवर रस्त्यांवर आंदोलक उतरले आणि त्यांंनी रस्ते, महामार्ग रोखून धरले. तर कळंबोली इथं आक्रमक आंदोलकांनी थेट पोलिसांनाच लक्ष्य केलं. पोलिसांच्या गाड्या जाळण्यासह पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळं आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना इथं हवेत गोळीबार करावा लागला.


१७ बसचं नुकसान

मानखुर्द इथं अज्ञातांनी बेस्टच्या ५१७ क्रमांकाच्या बसवर पेट्रोलच्या बाटल्या टाकून बस जाळण्याचा प्रयत्न केला. पण बस वाहकानं प्रसंगावधान दाखवत त्वरीत आग विझवली. ही बस कुर्ला आगाराची होती. बुधवारच्या बंदमध्ये बेस्टच्या १७ बसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे.

बेस्टबरोबर रेल्वेलाही यावेळी लक्ष्य करण्यात आलं. गोरेगाव, जोगेश्वरी, ठाणे, कल्याण, एेरोली इथं लोकल ट्रेन रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं त्याचा फटका थोडाफार प्रवाशांना बसला. एकूणच मुंबईत बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.



हेही वाचा-

Live Updates - मराठा क्रांती मोर्चा: मुंबई, ठाण्यातील वाहतूक विस्कळीत

मुख्यमंत्र्यांनी आता जनतेपुढंच माफी मागावी- विरेंद्र पवार



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा