मुंब्रा, दिव्याचा पाणी प्रश्न मार्गी लावणार - रणजीत पाटील

कालबद्ध नियोजनातून मुंब्रा व दिवा भागातील पाणी प्रश्न मार्गी लावणार असून त्यासाठी ठाणे महानगरपालिका आयुक्तांना सूचना देण्यात येतील, अशी माहिती नगर विकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी गुरूवारी विधानसभेत दिली. अामदार जितेंद्र आव्हाड यांनी यासंबंधी लक्षेवधी सूचना केली होती.

विभागणी २३ वॉटर डिस्ट्रीक्टमध्ये

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सध्याची लोकसंख्या सुमारे २३.५ लाख असून एकूण पाणी पुरवठा ४८५ द.ल.लि इतका आहे. पाण्याचे वहन व साठवण करण्याकरिता मुंब्रा व दिवा विभागात एकूण १० जलकुंभ व २ पंप हाऊस कार्यान्वित आहेत. या दोन प्रभागात ठाणे महानगपालिकेमार्फत उपलब्ध १०१.५० द.ल.लि.पाण्याव्यतिरिक्त इतर वापराच्या पाण्याकरिता ८८ विहिरी व ७२ ट्यूबवेल उपलब्ध आहेत. दोन प्रभागांमध्ये अतिरिक्त वहन व साठवण क्षमता वाढविण्याकरिता ठाणे महानगरपालिकेने रिमॉडलिंग प्रकल्प हाती घेतला आहे. त्यानुसार दोन प्रभागांची विभागणी २३ वॉटर डिस्ट्रीक्टमध्ये करण्याचं प्रस्तावित आहे.

आयुक्तांना सूचना

प्रकल्पासाठी १९२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून तो महासभेत मान्यतेसाठी ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. त्यानंतर याबाबत कालबद्ध नियोजन करुन त्याची अंमलबजावणी केली जाईल. तसेच कर्मचाऱ्यांची कमतरता होऊ नये यासाठी आयुक्तांना सूचना दिल्या जातील. पाणी चोरी व अधिकृत पाणी जोडणी याबाबत अधिवेशन संपताच लक्ष देण्याबाबत कार्यवाही होणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं. 


हेही वाचा - 

नव्या नोकरभरतीत मराठा समाजासाठी १६ टक्के जागा- मुख्यमंत्री

दूध आंदोलन, महाजन-शेट्टी बैठक सकारात्मक, तोडगा मात्र नाही!


पुढील बातमी
इतर बातम्या