अजित पवारांच्या उपस्थित राज यांची शरद पवारांशी ‘मन की बात’

लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच जाहीर केलं. त्यानंतर मंगळवारी त्यांनी रंगशारदा सभागृहात कार्यकर्त्यांना संबोधित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. अमित शाह यांच्या विरोधात प्रचार करण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन केलं. त्यानंतर बुधवारी राज यांनी अचानक शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात निरनिराळ्या चर्चांना उधाण आलं आहे.

अजित पवारही उपस्थित

राज ठाकरे यांनी आपली भूमिका मांडल्यानंतर लगेचच त्यांनी घेतलेल्या पवार भेटीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या भेटीदरम्यान त्या ठिकाणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील उपस्थित होते. परंतु त्यांच्या काय चर्चा झाली हे मात्र, अद्यापही गुलदस्त्यात आहे.

मोदींविरोधात रणशिंग फुंकलं

राज ठाकरे यांनी बुधवारी झालेल्या सभेत मोदी–शाह यांच्याविरोधात रणशिंग फुंकल्याचं पहायला मिळालं. तसंच यापूर्वी झालेल्या सभेतही त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका केली होती. तसंच आपण त्यांच्याकडे जागा मागितली नसून अशा बातम्या त्यांच्याचकडून पसरवल्या जात असल्याचं म्हणतं राज यांनी अजित पवारांनाही लक्ष्य केलं होतं. परंतु आता त्यांच्या या भेटीनंतर ते राष्ट्रवादीशी हातमिळवणी करतील अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. आता गुढीपाडव्याला राज ठाकरे पुन्हा एकदा कार्यकर्त्यांना संबोधित करणार असून ते त्यावेळी काय भूमिका घेतील हे पहावं लागणार आहे.


हेही वाचा - 

राज ठाकरे यांनी मोदी-शाह विरुद्ध घेतलेल्या भूमिकेचं सचिन अहिरांकडून स्वागत

'मनसेनं लोकसभा निवडणूक लढवून डिपॉझीट वाचवून दाखवावं', विनोद तावडेंचं राज ठाकरेंना आव्हान


पुढील बातमी
इतर बातम्या