मनसे अध्यक्ष राज ठाकरे १० दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर १० दिवसांचा महाराष्ट्र दौरा करणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याच्या आखणीसाठी मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक बोलावली होती.

राज्यभरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सहा विभागांमध्ये दौरे आयोजित केले आहेत. या दौऱ्यांमध्ये ते सर्वप्रथम मराठवाड्याचा दौरा करणार आहेत.

येत्या १४ डिसेंबर रोजी राज ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर येणार आहेत. यापैकी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याच्या तारखा निश्चित झाल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी मुंबईत झालेल्या एका बैठकीत दिली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी शिवतीर्थावर दुपारी दोन वाजता ही बैठक संपली. राज ठाकरे यांच्या नेतृत्वात झालेल्या या बैठकीला बाळा नांदगावकर, नितीन देसाईंसह महत्त्वाचे नेते उपस्थित होते. राज्यात येऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांसंदर्भातील पक्षाच्या भूमिकेबाबत या बैठकीत रणनिती आखली गेली.

बाळा नांदगावकर यांनी माहिती दिली की, १४ डिसेंबर रोजी राज ठाकरे औरंगाबादमध्ये जाणार आहेत. कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करताना जेवढ्या कार्यकर्त्यांची परवानगी मिळेल, तेवढ्याच संख्येनं कार्यकर्ते आणि नेते या बैठकीला उपस्थित राहतील. ही बैठक सकाळी १० वाजता होईल.

त्यानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील. तसेच माध्यमांशीही संवाद साधतील. १६ डिसेंबर रोजी राज ठाकरे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यासाठी पुण्यात जातील. त्यानंतर कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातही राज ठाकरे जातील.


हेही वाचा

सर्व पक्ष एकत्र आल्यास भाजपचा सहज पराभव - ममता बॅनर्जी

बेस्टच्या वाढीव वीज बिलासंदर्भात राज ठाकरे आक्रमक

पुढील बातमी
इतर बातम्या