ग्रामपंचायत निवडणुकांसाठी सज्ज व्हा! राज ठाकरेंचे आदेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ग्रामपंचायत निवडणूक संपूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील ग्रामपंचायती निवडणुकांसाठी सज्ज व्हा! असे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी राज्यभरातील मनसैनिकांना दिले आहेत. 

महाराष्ट्रातील (maharashtra) ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान; तर १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी नुकतीच केली.

एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या १ हजार ५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ३१ मार्च २०२० रोजी मतदान होणार होतं; परंतु कोविड-१९ ची परिस्थिती उद्‌भवल्याने १७ मार्च २०२० रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला. यासह डिसेंबर २०२० अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व  ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

हेही वाचा- गाड्यांवरील मराठी नंबर प्लेट, मनसेने ठाकरे सरकारकडे केली 'ही' मागणी

या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे २३ ते ३० डिसेंबर २०२० या कालावधीत स्वीकारली जातील. शासकीय सुटीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी ३१ डिसेंबर २०२० रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे ४ जानेवारी २०२१ पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. तर मतमोजणी १८ जानेवारी २०२१ रोजी होईल. गडचिरोली जिल्ह्यात फक्त मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत असेल, अशी माहिती मदान यांनी दिली.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या भागातील सर्वच ग्रामपंचायतीत आपले उमदेवार उभे करावेत आणि त्यांना संपूर्ण ताकदीने निवडून आणवेत, असे निर्देश राज ठाकरे यांनी तमाम मनसे पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. सोबतच सर्व उमेदवारांची पूर्ण माहिती मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाला पाठवण्याचे देखील निर्देश दिले आहेत.

हेही वाचा- ठाकरे सरकारची नवी परीक्षा, राज्यात १४,२३४ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान
पुढील बातमी
इतर बातम्या