Advertisement

ठाकरे सरकारची नवी परीक्षा, राज्यात १४,२३४ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान

राज्यात ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार आहे.

ठाकरे सरकारची नवी परीक्षा, राज्यात १४,२३४ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी मतदान
SHARES

विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर मतदारसंघात बाजी मारून आत्मविश्वास दुणावलेल्या ठाकरे सरकारची नवी परीक्षा ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने होणार आहे. महाराष्ट्रातल्या (maharashtra) ३४ जिल्ह्यांतील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान; तर १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. त्यासाठी शुक्रवारपासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी केली.

ग्रामपंचायत निवडणुकीविषयी माहिती देताना यूपीएस मदान यांनी सांगितलं, एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या १ हजार ५६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ३१ मार्च २०२० रोजी मतदान होणार होतं; परंतु कोविड-१९ ची परिस्थिती उद्‌भवल्याने १७ मार्च २०२० रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला. यासह डिसेंबर २०२० अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व  ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

हेही वाचा- शिवडी-वरळी कनेक्टरच्या कामाला मिळणार गती

नामनिर्देशनपत्रे ३० डिसेंबरपर्यंत

या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्रे २३ ते ३० डिसेंबर २०२० या कालावधीत स्वीकारली जातील. शासकीय सुटीच्या दिवशी नामनिर्देशनपत्रे स्वीकारली जाणार नाहीत. त्यांची छाननी ३१ डिसेंबर २०२० रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे ४ जानेवारी २०२१ पर्यंत मागे घेता येतील व त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होईल. मतदान १५ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल. तर मतमोजणी १८ जानेवारी २०२१ रोजी होईल. गडचिरोली जिल्ह्यात फक्त मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत असेल, अशी माहिती मदान यांनी दिली.

२५ सप्टेंबरची मतदार यादी ग्राह्य धरणार

विधानसभा मतदारसंघाची २५ सप्टेंबर २०२० रोजी अस्तित्वात असलेली मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार तयार करण्यात आलेल्या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यावर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ७ डिसेंबर २०२० पर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार अंतिम मतदार याद्या १४ डिसेंबर २०२० रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहेत, अशी माहितीही मदान यांनी दिली.

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या:

ठाणे- १५८, पालघर- ३, रायगड- ८८, रत्नागिरी- ४७९, सिंधुदुर्ग- ७०, नाशिक- ६२१, धुळे- २१८, जळगाव- ७८३, अहमनगर- ७६७, नंदुरबार- ८७, पुणे- ७४८, सोलापूर- ६५८, सातारा- ८७९, सांगली- १५२, कोल्हापूर- ४३३, औरंगाबाद- ६१८, बीड- १२९, नांदेड- १०१५, उस्मानाबाद- ४२८, परभणी- ५६६, जालना- ४७५, लातूर- ४०८, हिंगोली- ४९५, अमरावती- ५५३, अकोला- २२५, यवतमाळ- ९८०, वाशीम- १६३, बुलडाणा- ५२७, नागपूर- १३०, वर्धा- ५०, चंद्रपूर- ६२९, भंडारा- १४८, गोंदिया- १८९ आणि गडचिरोली- ३६२. एकूण- १४,२३४.

(election commission declared maharashtra gram panchayat election on 15th january 2020)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा