Raj Thackeray: राज ठाकरेंनी केलं ठाकरे सरकारबद्दल ‘हे’ भाकीत

राज्यातील तीन पक्षांचं सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही. कारण या तिन्ही पक्षांमध्ये कोणताही संवाद दिसत नाहीय. कुठलाही ताळमेळ जाणवत नाहीय, असं भाकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं. एक वृत्तवाहिनीला मुलाखत देताना राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं. (mns chief raj thackeray speaks on maha vikas aghadi government )

राज ठाकरे यासंदर्भात पुढं म्हणाले की, ज्या वेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे परस्पर विचारधारेचे तीन पक्ष आले, तेव्हाच हे सरकार फारकाळ टिकणार नाही, असं भाकीत मी केलं होतं. कुठल्याही मंत्र्यांचा एकमेकांशी संवाद नाही. सध्याच्या स्थितीत त्यांच्यातील कुरबुरी बघता या सरकारमध्ये कुठलाही ताळमेळ असलेला दिसून येत नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा - Ram Mandir: राम मंदिर नक्कीच झालं पाहिजे, पण भूमिपूजनाची ही योग्य वेळ नाही- राज ठाकरे

राज्य केंद्राकडे बोट दाखवतंय, केंद्र राज्यांकडे बोट दाखवतंय, पण लोकांना याविषयी घेणं देणं नाही. लोकांची एकच अपेक्षा आहे की आम्हाला यातून सोडवा. उद्धव ठाकरे टीव्हीवर दिसत होते, त्या सरकारचा कारभार दिसत नाहीय, दिसला नाही. कोरोनाबाबत लोकांच्या मनात कमालीची भीती निर्माण झाली आहे, माध्यमांनी देखील ही भीती वाढवली. कोरोनाचा संसर्ग गंभीर आहे, पण त्याचा बाऊ खूप केला गेला. आणि मोठ्या घरांचं ठीक आहे पण झोपड्यांमध्ये कुठून क्वारंटाईन होणार होते? लॉकडाऊन उठवण्याचा नक्की आराखडा काय? किती काळ लॉकडाऊनमुळे लोकांची फरफट करणार? हे सरकारने स्पष्ट करायला हवं. आता सगळं सुरळीत करावंच लागेल.कोरोना विषाणूसोबत जगावंच लागेल, असं राज ठाकरे म्हणाले. 

कोरोनाचं संकट अभूतपूर्व आहे. पण त्या काळात सरकारवर टीका करण्याची वेळ नव्हती. दोन्ही सरकारच्या चुका झाल्या; पण ती वेळ राजकारण करण्याची नव्हती म्हणून विरोधी पक्षांनी जबाबदारीने वागायला हवं होतं, असं म्हणत राज ठाकरे यांनी विरोधकांनाही चिमटा काढला.

माझ्या मनातील महाराष्ट्र कसा असावा याचं चित्र माझ्या महाराष्ट्राच्या विकास आराखड्यात मांडला आहे, जेंव्हा माझ्या हातात सत्ता येईल तेव्हा मी तो घडवेन. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं माझा स्वप्न आहे, त्यासाठी जनतेनी आशीर्वाद द्यावा, असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं.

हेही वाचा - Electricity Bill: अन्यथा आम्हाला झटका द्यावा लागेल, राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
पुढील बातमी
इतर बातम्या