Advertisement

Electricity Bill: अन्यथा आम्हाला झटका द्यावा लागेल, राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ लक्ष घालून वीजबिलात सूट द्यावी तसंच खाजगी वीज कंपन्यांना कडक शब्दांत समज द्यावी अन्यथा या खाजगी वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुनावलं आहे.

Electricity Bill: अन्यथा आम्हाला झटका द्यावा लागेल, राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा
SHARES

आधीच लाॅकडाऊनमुळे सर्वसामान्यांच्या खिशात पैसा नाही. त्यातच वीज वितरण कंपन्यांनी पाठवलेल्या अव्वाच्या सव्वा वीज बिलामुळे सर्वसामान्यांपुढं खावं की वीज बिल भरावं, अशी बिकट परिस्थिती निर्माण केली आहे. कुठलीही सवलत मिळत नसल्याने वाढीव वीज बिलांविरोधात शहरी आणि ग्रामीण भागांतील वीज ग्राहकांमधील असंतोष वाढीस लागला आहे. त्याची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्य सरकार आणि वीज कंपन्यांना इशारा दिला आहे. मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ लक्ष घालून वीजबिलात सूट द्यावी तसंच खाजगी वीज कंपन्यांना कडक शब्दांत समज द्यावी अन्यथा या खाजगी वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुनावलं आहे. (mns chief raj thackeray warns maharashtra government over extra electricity bill during lock down)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात राज ठाकरे म्हणाले आहेत की, कोरोनाच्या या लढाईत बहुदा राज्य सरकारचं एका महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष तरी होतंय किंवा या विषयातील जनतेच्या तीव्र भावना त्यांच्यापर्यंत पोहचत नसाव्यात आणि म्हणूनच या विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरकारचं लक्ष वेधून घेऊ इच्छिते.

खाजगी वीज कंपन्या असोत, महावितरण असो की बेस्ट असो सगळ्यांनी एकत्रितपणे राज्यातील वीजग्राहकांना वीजबिलांचा जबरदस्त शॉक दिला आहे. जून महिन्याची जी बिलं ग्राहकांना पाठवली गेली आहेत, ती शब्दशः सामान्य माणसाचे डोळे पांढरे करणारी आहेत. मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांची सरासरी वीज बिलं पाठवल्यानंतर त्या तीन महिन्यांत विजेचा झालेला वापर आणि सरासरी विजेची बिलं यांच्यातील तफावत जून-जुलै महिन्यात ग्राहकांच्या माथी मारण्यात येत आहे. तफावतीच्या नावाखाली बिलांच्या ज्या रकमा आकारल्या गेल्या आहेत त्यावरून त्याला तफावत न म्हणता लूटच म्हणावं लागेल. त्यात टाळेबंदीमुळे व्यावसायिक आस्थापनं देखील गेली ३ महिने बंद होती, तरीही त्यांना सरासरी वीज बिलांच्या नावाखाली अव्वाच्यासवा बिलं आकारली गेली आहेत. टाळेबंदीमुळे अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत, अनेक ठिकाणी पगारकपात झाली आहे, तर अनेक आस्थापनांनी नोकरकपात सुरु केली आहे. अशा वेळेस जिथे उदरनिर्वाहाचीच शाश्वती नसताना तिथे ही वीजबिलं म्हणजे सामान्यांच्या मोडलेल्या कंबरड्यावरच प्रहार करणं आहे.

हेही वाचा - Electricity Bill: थकबाकी असेल तरी वीज कापणार नाही, ऊर्जामंत्र्यांचं आश्वासन

कोरोनाची परिस्थिती अभूतपूर्व होती आणि त्यामुळे राज्यातील जनता, राजकीय पक्ष एकदिलाने सरकारच्या पाठीशी ठाम उभे राहिले आणि भविष्यात देखील राहतील, पण या अशा विषयांत जनता आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना गप्प बसेल अशी चुकीची समजूत सरकारने करून घेऊ नये.

राज्याला महसुलाची अडचण आहे, हे सर्वांना मान्यच आहे पण म्हणून जनतेच्या खिशाला त्यासाठी भोक पाडणं हा मार्गच असू शकत नाही. म्हणूनच या विषयात मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ लक्ष घालावं आणि या वीजबिलात तात्काळ सूट द्यावी, तसंच ही सूट कोणत्याही प्रकाराने भविष्यात वसूल करायचा प्रयत्न करू नये. राज्य सरकारने महावितरण आणि बेस्ट सारख्या सरकारी आस्थापनांना तात्काळ आदेश द्यावेत आणि खाजगी वीज कंपन्यांना देखील कडक शब्दांत समज द्यायला हवी अन्यथा ह्या खाजगी वीज कंपन्यांना आम्हाला झटका द्यावा लागेल.

विषय संवेदनशील आहे आणि सरकार देखील संवेदनशीलपणे हा विषय हाताळेल याची मला खात्री आहे.

आपला नम्र,

राज ठाकरे.

अशा शब्दांत राज ठाकरे यांनी सरकारला याप्रश्नी गांभीर्याने लक्ष घालण्याची विनंती केली आहे. यावरून आता वाढीव वीज बिलाचा मुद्दा पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष वेधून घेऊ शकतो.

हेही वाचा - Electricity Bill: वीज बिल ५० टक्के माफ करा, विरारमध्ये जोरदार आंदोलन

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा