Advertisement

Ram Mandir: राम मंदिर नक्कीच झालं पाहिजे, पण भूमिपूजनाची ही योग्य वेळ नाही- राज ठाकरे

राम मंदिराचं भूमिपूजन धुमधडाक्यात व्हायला पाहिजे. त्यासाठी दोन महिन्यांनी जरी भूमिपूजन झालं असतं, तरी चाललं असतं.

Ram Mandir: राम मंदिर नक्कीच झालं पाहिजे, पण भूमिपूजनाची ही योग्य वेळ नाही- राज ठाकरे
SHARES

राम मंदिर नक्कीच झालं पाहिजे, राम मंदिराचं भूमिपूजनही धुमधडाक्यात झालं पाहिजे. परंतु आता ती वेळ नाही, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमावर आपली भूमिका मांडली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना राज ठाकरे यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं आहे. (not a right time for ram mandir bhumi pujan says mns chief raj thackeray)

राम मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमावर सध्या राजकीय पातळीवर बरीच चर्चा सुरू आहे. यासंदर्भात आपल्याला काय वाटतं? असं विचारलं असता राज ठाकरे म्हणाले, यात दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत. पहिला की राम मंदिर झालं पाहिजे का? तर निश्चित झालं पाहिजे. ही माझी खूप आधीपासूनची भूमिका आहे. एवढंच नाही, तर ही भूमिका मी जाहीर सभांमधून अनेकदा मांडली देखील आहे. त्यासाठी जर भूमिपूजन होत असेल तर माझ्यासाठी, माझ्या पक्षासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

हेही वाचा - Ram Mandir: राम मंदिर भूमिपूजनाला जाणार उद्धव ठाकरे

त्यातला दुसरा मुद्दा हा की राम मंदिराचं भूमिपूजन करण्याची हीच योग्य वेळ आहे का? तर मला असं वाटत नाही. कारण लोकं सध्या वेगळ्याचं चिंतेत आहेत. राम मंदिराच्या भूमिपूजनाची वेळ आताच का ठरवण्यात आली, याची मला कल्पना नाही. लोकांच्या मनातील कोरोनाची भीती दूर झाल्यावर सगळं स्थिरस्थावर झाल्यावर राम मंदिराचं भूमिपूजन धुमधडाक्यात व्हायला पाहिजे. हा लोकांच्या आनंदाचा भाग आहे. त्यामुळे त्याचं ई-भूमिपूजन नको. त्याचं जल्लोषात भूमिपूजन हवं. त्यासाठी दोन महिन्यांनी जरी भूमिपूजन झालं असतं, तरी चाललं असतं. राममंदिर व्हायलाच हवं, ज्यासाठी असंख्य करसेवकांनी त्यासाठी प्राणांची आहुती दिली. त्यामुळे राममंदिराचं भूमिपूजन व्हायला हवं, पण सध्याची परिस्थिती बघता भूमिपूजनाची वेळ योग्य नाही. 

सध्याच्या स्थितीत भूमिपूजन झाल्यावर फार तर त्याची एका दिवसाची बातमी होईल, एका दिवसाच्या चर्चा होतील. त्यापलिकडे आनंद साजरा करण्याची मानसिकतेत कुणीही नाही. राम मंदिर भूमिपूजनाचा आनंद नक्कीच आहे. पण मंदिर प्रत्यक्षात उभं राहिल्यावर जास्त आनंद होईल, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. 

येत्या ५ आॅगस्ट रोजी अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भूमिपूजन होणार आहे. या भूमिपूजन कार्यक्रमासाठी निवडक २०० जणांनाच निमंत्रण पाठवण्यात येईल, अशी माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिली आहे. 

सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमापेक्षा लोकांची मदत करण्याला आपलं पहिलं प्राधान्य राहिल. यामुळे राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाचं निमंत्रण आलं, तरी अयोध्येला जाणार नाही, असं वक्तव्य करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीकेचा रोख आपल्याकडे वळवून घेतला होता.

हेही वाचा - "राम मंदिर होईल, तेव्हाच कोरोना जाईल.."!

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा