नवीन वर्ष, नवा राडा? राज काय देणार कानमंत्र?

गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर नवनिर्माणाची गुढी उभारण्यास सज्ज असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी सायंकाळी कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. खासकरून या सभेचं निमंत्रण

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना दिल्याचं म्हटलं जात असून पवार खरंच या सभेला उपस्थित राहतील का? याविषयीची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे.

जय्यत तयारी

राज यांच्या गुढी पाडवा मेळाव्याची जय्यत तयारी दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर करण्यात आली आहे. सायंकाळी ५ वाजता ही सभेला सुरूवात होणार असून या सभेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून मनसेचे कार्यकर्ते दादरला पोहोचत आहेत.

काय बोलणार राज?

या मेळाव्याच्या पूर्वसंध्येला राज यांनी पवार यांच्या पेडर रोड येथील निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही, असं राज म्हणाले असले, तरी मनसे अन् राष्ट्रवादीच्या नव्या युतीवर तर या बैठकीत चर्चा झाली नाही ना? याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.

या नव्या समीकरणावर राज बोलणार का? पक्षातील मरगळ झटकून कार्यकर्त्यांसमोर नवीन संकल्प, कार्यक्रम ठेवणार का? पक्षाची पुढील वाटचाल, भूमिका कशी असेल यावर मार्गदर्शन करणार का? याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे.

नवीन वर्ष नवा राडा?

मनसेच्या १२ व्या वर्धापन दिन मेळाव्यात कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना राज यांनी पुन्हा एकदा फेरीवाल्यांचा प्रश्न उपस्थित करून जे महापालिका अधिकारी फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात चालढकलपणा करतील, त्यांच्यावर न्यायालयाच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी खटले भरा, माझ्या भाषणादरम्यान वीज घालवणाऱ्या वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना 'तुडवा' असा संदेश दिला होता.

त्यामुळे गुढी पाडव्याच्या भाषणात नवीन वर्षाचा संकल्प म्हणून नवीन राडा छेडण्याची भाषा राज करतात का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.


हेही वाचा-

पाडवा सभेआधी राज ठाकरेंनी घेतली शरद पवारांची भेट

कुणी वरून जरी आलं, तरी मुंबई महाराष्ट्रवेगळी करू शकत नाही- पवार


पुढील बातमी
इतर बातम्या