मनसे लोकसभा निवडणूक लढवत नसली तरी मनसेमुळे लोकसभा निवडणुकीत मोठी रंगत आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भाजपा विरुद्ध मनसे असा सामना रंगला आहे. त्यातच पुन्हा एकदा मनसेनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना लक्ष्य केलं आहे.
नवी मुंबईचे मनसेचे जिल्हाध्यक्ष गजानन काळे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून लग्नपत्रिका शेअर करून विवाहाचं निमंत्रण दिलं आहे. गाजर विवाह या संकल्पनेतून त्यांनी चौकीदार आणि थापाबाईचं लग्नसोहळा आयोजित केला आहे. खोट्या आश्वासन कृपेने २९ एप्रिल रोजी ५६ इंचाच्या मुहूर्तावर हा सोहळा होणार असून जॅकेटवाला फुगा, विनोदी मंत्री, पिस्तुलधारी गिऱ्या हे येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करणार असल्याचं सांगत काळे यांनी मुख्यमंत्र्यांसह भाजपाच्या मंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
यापूर्वीही गजानन काळे यांनी गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना आपल्या गाडीत बसण्याची संधी देण्याची विनंती करत त्यांची खिल्ली उडवली होती. त्यानंतर आता त्यांनी गाजर विवाहाची पत्रिका आपल्या ट्विटरवरून शेअर करून थेट मुख्यमंत्र्यांना आणि जलसंपदामंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा -
वरळी कोळीवाड्यातील मच्छिमारांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
प्रिया दत्त यांच्यासाठी संजय करणार रोड शो