मनसेच्या नितीन नांदगावकर यांना तडीपारची नोटीस

ग्रांऊड लेवलला जाऊन प्रत्यक्षात नागरिकांची समस्या सोडवणारे मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांना पोलिसांनी तडीपारची नोटीस बजावली आहे. स्वत: नितीन नांदगावकर यांनी फेसबूक व्हिडीओच्या माध्यमांतून ही माहिती दिली आहे. पोलिसांनी उचललेल्या या पावलामुळे सोशल मिडियावर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

निवडणुकीच्या तोंडावर तडीपार

सर्व सामान्य मुंबईतल्या मराठी नागरिकांवर होणारा अन्याय आणि त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी नितीन नांदगावकर हे वेळोवेळी धावून गेले आहेत. त्यामुळे सर्व सामान्यांमध्ये त्यांची लोकप्रियता अधिक आहेत. पासपोर्ट घोटाळा, बेशिस्त रिक्षा आणि टॅक्सी चालक, अंमली पदार्थांचे सेवन करणारे गर्दुले यांच्या विरोधात नितीन नांदगावकर यांनी वेळोवेळी मनसे स्टाइलनं लक्ष वेधून घेतले. मात्र त्यामुळे अनेकदा त्यांना पोलिस ठाण्याच्या वाऱ्याही कराव्या लागल्या. त्यामुळेच की काय लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आता नांदगावकर यांना तडीपार करण्याचं ठरवलं. बुधवारी नांदगावकर यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट करत, ही माहिती दिली आहे.

काय म्हणाले नांदगावकर?

मुंबई पोलिसांच्या या नोटिसला उत्तर देताना संघर्ष अटळ असल्याची प्रतिक्रिया नांदगावकर यांनी फेसबुकवर दिली आहे. माझी भिती नेमकी कोणाला वाटतेय? सर्वसामान्य नागरिकांना माझी भिती वाटते असा आरोप ठेऊन मला तडीपार करण्यासाठी मुंबई पोलीस कामाला लागले आहेत. महाराष्ट्र माझा आहे. कुठे कुठे मला तडीपार करणार? जनतेनं सांगावं मी कुठे चुकतोय? मी अन्यायाच्या विरोधात लढत राहणार, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे.

#isupportnitinnandgaonkar मोहीम सुरू

दरम्यान, ऐन निवडणुकीच्या तोंडावर नांदगावकर यांना तडीपार करण्याच्या हालचाली सुरू झाल्यामुळे मनसेनं या कारवाईला विरोध सुरू केला आहे. ट्वीटरवर #isupportnitinnandgaonkar या नावानं मोहीम सुरू केली आहे. सोशल मीडियावर नेटीझन्सनी नांदगावकर यांना पाठींबा दिला असून आम्ही तुमच्या सोबत आहोत अशी प्रतिक्रिया दिल्या आहेत.


हेही वाचा

अखेर 'युती' झाली

युती ही फक्त मातोश्रीच्या फायद्यासाठी - नारायण राणे


पुढील बातमी
इतर बातम्या