मुंबईच्या वरळी येथील ब्ल्यू सी हाँटेलमध्ये सोमवारी शिवसेना-भाजपने युतीची घोषणा केली. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निडणूकीत भाजप 25 आणि शिवसेना 23 जागांवर लढणार आहे. तर विधानसभा निवडणूकीत मित्रपक्षांना जागा सोडून दोन्ही पक्ष अर्ध्या अर्ध्या जागा वाटून घेणार आहेत. मात्र या युतीच्या घोषणेनंतर शिवसेनेचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत युतीबाबत नाराजी व्यक्त केली.
शिवसेनेनं वेळोवेळी नागरिकांची दिशाभूल केली आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात यापुढे युती करणार नाही, असं किती वेळा बोलून दाखवलं. त्यावेळी भाजपवर टिका करण्याची कोणतिही संधी शिवसेनं सोडली नाही. मग आता एका दिवसात असं काय झालं की उद्धव ठाकरे यांनी युती केली, असा प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे. युती झाली तरी त्यांची मनं जुळलेली नाहीत. दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी स्वबळावर लढण्याची तयारी केली होती. ऐनवेळी त्यांनी काय करावं, असा सवाल राणेंनी उपस्थित केला.
मुंबईत मराठी लोकांची टक्केवारी कमी झाली याला जबाबदार कोण? त्याचं उत्तर का देत नाही उद्धव ठाकरे, असंही राणे यांनी विचारलं. त्यामुळे युती जरी झाली असली, तरी त्याचा फायदा दोन्ही पक्षांना होईल, असं वाटत नसल्याचं राणे बोलले. तसंच शिवसेनेचं जेथे जेथे उमेदवार असतील त्यांना पाडण्यासाठी राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काम करेल, असा इशाराही राणे यांनी दिला.
युतीवर जरी नाराज असलो, तरी भाजपने दिलेल्या राज्यसभेच्या जागेचा राजीनामा देणार नसल्याचे राणेंनी स्पष्ट केले. तसंच आपण भाजपचे सदस्य नसून त्यांच्या पाठींब्यामुळे तिकडे असल्याचंही सांगितलं. तसंच यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे उमेदवार उभे करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत नागरिकांकडून मिळणाऱ्या पाठींब्यानुसार विधानसभेची तयारी करणार असल्याचंही राणेंनी सांगितले.
हेही वाचा