पालिका निवडणुका पुढे का ढकलल्या? राज ठाकरेंनी सांगितलं कारण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १६व्या वर्धापन दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महापालिका निवडणुकांबाबत (Municipal Election) मोठा दावा केलाय. निवडणुकांचे फटाके आता दिवाळीनंतरच वाजतील, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय.

इतकंच नाही तर निवडणुका पुढे ढकलण्याच्या मुद्द्यावरून राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय.

निवडणुका पुढे ढकलण्यासाठी ओबीसी समाजाचं कारण पुढे करण्यात आलं. पण खरं कारण वेगळंच असल्याचं म्हणत राज यांनी उद्धव ठाकरे यांच्या आजारपणावर बोट ठेवलं.

राज ठाकरे म्हणाले की, निवडणुका लांबणीवर पडणार हे मी नोव्हेंबरमध्ये सांगितलं होतं. निवडणूक आली की निवडणूक चढायला लागते. आता तुम्हाला बरोबर ते कळलं असेल. वातावरणात निवडणूक यायला लागते. मला ते वातावरणात दिसेना.

पुढे ते म्हणाले, आमच्या ओबीसी समाजाचं कारण पुढे केलं… सगळं खोटं. यांना निवडणूक घ्यायचीच नव्हती. मला कुणाच्या वैयक्तिक आयुष्याबाबत, दुखण्याबाबत बोलायचं नाही. मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नाही, पण मला त्याबाबत काही बोलायचं नाही. पण खरं कारण ते आहे. तीन महिने निवडणुका पुढे म्हणजे जून, धो धो पाऊस.. सामान्यांना निवडणुकांचं काही देणं घेणं नाही. निवडणुका फक्त उभं राहणाऱ्यांसाठी महत्वाच्या आहेत. साला आपली कापली जाते की राहते.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल भाष्य केलं होतं. त्यांच्या विधानाचा निषेध करत राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत उत्तर दिले.

'राज्यपालांनी काही दिवसांपूर्वी महात्मा ज्योतिबा सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल विधान केलं. अहो त्यावेळी लहानपणी लग्न व्हायची, अजून तुमचे तरी लग्न झाले नाही. नको तिथे बोट कशाला घालायचं. त्यानंतर लगेच तुम्हाला काय वाटतं, असं म्हणत माध्यम सुरू झाली. पण जेव्हा निवडणुका लांबणीवर पडल्या तेव्हा सगळे शांत झाली, असा टोला राज ठाकरेंनी लगावला.


हेही वाचा

६ महिन्यानंतर मुंबई पालिकेच्या निवडणुका होण्याची शक्यता

शिवरायांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांवर राज ठाकरेंचा निशाणा

पुढील बातमी
इतर बातम्या