Corona virus :...तर कोरोनाग्रस्त रुग्णांना स्थानबद्ध करणार- राजेश टोपे

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३८ वर पोहोचली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकारनं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली असून, गर्दीची ठिकाणं बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच कोरोनाग्रस्त रुग्णांनी विलगीकरणास सहकार्य केलं नाही तर, त्याला स्थानबद्ध करण्याचे अधिकार जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

हेही वाचाः- Corona virus : कोरोनामुळे आरटीई सोडत व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे

राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळं या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार खबरदारी घेत आहे. राज्यातील सर्व मॉल्स, चित्रपटगृहे, तरणतलाव, व्यायामशाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच मुंबईत जमावबंदी आदेशही लागू करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आज आरोग्यमंत्री टोपे यांनी कोरोनाग्रस्त रुग्ण आणि त्यांना देण्यात येणार्‍या सोयीसुविधांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. कोरोनामुळं मृत्यू होण्याचं प्रमाण कमी असलं तरी, संसर्ग होण्याचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळं कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक पावलं उचलली जात आहेत. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालय, सेव्हन हिल्स रुग्णालय आदी ठिकाणीही भेटी देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. रुग्णांवर उपचार करण्यासंबंधी आणि त्यांना आवश्यक सुविधा देण्यासंबंधी सूचना दिल्या, असं टोपे यांनी सांगितलं.

हेही वाचाः- Corona virus : मुंबईत जमावबंदीचा आदेश लागू

नागपूरमध्ये रुग्णालयातून संशयित रुग्ण पळून गेल्याची माहिती उघडकीस आल्यानंतर, आता त्यादृष्टीनं खबरदारी घेण्यात येत आहे. कोरोनाग्रस्त रुग्ण किंवा संशयित रुग्ण पळून जाऊ नयेत, यासाठी पोलिसांचा पहारा ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेल्या सात देशांतून भारतात परतणार्‍यांवर सरकारकडून विशेष लक्ष ठेवलं जाणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिकृत रुग्णालये आणि प्रयोगशाळांमध्येच चाचणी होणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. पुढील आदेश किंवा सूचना येईपयर्ंत परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे, असं सांगितलं जात आहे

पुढील बातमी
इतर बातम्या