आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा, मग राम मंदिर बांधण्याचा विचार करा- नारायण राणे

ज्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं मुंबईत स्मारक बांधता येत नाहीत ते अयोध्येत राम मंदिर बांधण्याची भाषा करत आहेत. त्यामुळे आधी बाळासाहेबांचं स्मारक बांधा आणि मग राम मंदिर बांधण्याचा विचार करा, असा टोला महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

गर्दी की जमवाजमव?

एवढंच नाही, तर आता लोकसभा-विधानसभा निवडणुका जवळ आल्यानेच उद्धव यांना रामाची आठवण झाल्याचा प्रहारही राणे यांनी केला. तर दसरा मेळाव्यातील गर्दी ही लोकांची जमवाजमव असल्याचा चिमटाही उद्धव यांना काढला.

अयोध्येत जाणार

राम मंदिर तुम्ही बांधता की आम्ही बांधू? असं आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देत उद्धव ठाकरे यांनी २५ नोव्हेंबरला आयोध्येला जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. आयोध्येत जाऊन मोदींना राम मंदिराविषयी जाब विचारू अशी घोषणाही उद्धव यांनी शिवाजी पार्क येथील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात केली.

भाषण नव्हे, किर्तन

उद्धव ठाकरे यांच्या या घोषणेचा आणि दसरा मेळाव्यातील भाषणाचा राणे यांनी खरपूस समाचार घेतला आहे. दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांचं भाषण हे भाषण नव्हे, तर किर्तन होतं. किर्तनकार येतो नि किर्तन करून जातो, तसाच अनुभव दसरा मेळाव्यात आल्याचा टोमणा राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

तर, सत्तेतून बाहेर पडा

गेल्या ४ वर्षांपासून शिवसेना केंद्रात आणि राज्यात भाजपाबरोबर सत्तेत आहे. तेव्हा सेनेला या ४ वर्षांत राम मंदिराची आठवण आली नाही का? असा सवालही त्यांनी केला आहे. तर इतकाच स्वाभिमान आहे तर सेना राजीनामा देऊन बाहेर का पडत नाही? असाही प्रश्न राणे यांनी उपस्थित केला.


हेही वाचा-

तुम्ही राममंदिर बांधता की आम्ही बांधू?, उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला आयोध्येत

#MeToo: नाना 'तसे' नाहीत, राज यांनी केली पाठराखण!


पुढील बातमी
इतर बातम्या