Advertisement

#MeToo: नाना 'तसे' नाहीत, राज यांनी केली पाठराखण!

'नाना पाटेकर थोडे गावरान आहेत. ते कधी कधी उद्धटपणा करतात, विचित्र वागतात हे खरं आहे. पण मी त्यांना ओळखतो. ते महिलांच्या बाबतीत काही चुकीचं करणार नाहीत, असं राज म्हणाले.

#MeToo: नाना 'तसे' नाहीत, राज यांनी केली पाठराखण!
SHARES

नाना पाटेकर आपले मित्र आहेत. मी त्यांना ओळखतो. ते कधी-कधी उद्धटपणा करतात, विचित्र वागतात, हे खरं आहे. पण त्यांनी तनुश्री दत्तासोबत काही चुकीचं केलं असेल, असं आपल्याला वाटत नाही, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नानांची पाठराखण केली आहे. अमरावतीतील अंबा फेस्टिव्हल ट्रस्टतर्फे श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्याालयाच्या मैदानावर आयोजित प्रकट मुलाखतीत राज यांनी आपलं मत व्यक्त केलं.

'हाॅर्न ओके प्लिज' या सिनेमाच्या शुटींगवेळी नानांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ताने केला होता. सोबतच तिने मनसेवरही गाडीची मोडतोड करत दबाव टाकल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर प्रथमच राज या विषयावर बोलले.


काय म्हणाले राज?

'नाना पाटेकर थोडे गावरान आहेत. ते कधी कधी उद्धटपणा करतात, विचित्र वागतात हे खरं आहे. पण मी त्यांना ओळखतो. ते महिलांच्या बाबतीत काही चुकीचं करणार नाहीत.


अन्य विषयांतील गांभीर्याकडे दुर्लक्ष

सध्या '#MeToo' प्रकरणावरून देशात जे वातावरण पेटवलं जात आहे, त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किंमती, बेरोजगारी आणि रूपयाचं घसरतं मूल्य अशा महत्त्वांच्या विषयांवरून लोकांचं लक्ष विचलीत होत आहे. यामुळे या महत्त्वाच्या विषयांतील गांभीर्य निघून जाण्याचा धोका असल्याची भीतीही राज यांनी व्यक्त केली.


न्यायालय सक्षम

सध्या सोशल मीडियात '#MeToo' अभियानाची जोरदार चर्चा सुरू आहे. हा अतिशय संवेदनशील विषय असल्याने सोशल मीडियात या विषयाची चर्चा व्हायला नको तसंच त्याची चेष्टाही व्हायला नको. मीडियाने या प्रकरणांत अनावश्यक लुडबूड करू नये. कारण आपली न्यायालये अशी प्रकरणे हाताळण्यास सक्षम आहेत. अशा प्रकरणांचा निवाडा न्यायालये करतीलच, असं म्हणत राज यांनी सोशल मीडियावरील चर्चांना लक्ष्य केलं.


महिलांनो, तेव्हाच करा तक्रार

महिलांवर जेव्हा अन्याय होतो, तेव्हाच त्यांनी या अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे. १० वर्षांनी नाही. एवढंच नाही, तर कुठल्याही महिलेला आक्षेपार्ह गोष्टींचा सामना करावा लागत असेल, त्यांनी त्वरीत मनसेशी संपर्क साधण्याचं आवाहनही त्यांनी केलं.



हेही वाचा-

नानांची नार्को टेस्ट करा! तनुश्रीची पोलिसांकडे मागणी

माझ्यासोबत कोणी चुकीचं वागून पळून जाऊ शकत नाही - लता मंगेशकर



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा