तुम्ही राममंदिर बांधता की आम्ही बांधू?, उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला आयोध्येत

दादरच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात? याकडे शिवसैनिकांसह राजकीय जाणकारांचं लक्ष लागलं होतं. त्यानुसार अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर, पेट्रोल-डिझेलवाढ, महागाईचा मुद्दा उचलून धरत पंतप्रधान नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्यावर निशाणा साधला.

  • तुम्ही राममंदिर बांधता की आम्ही बांधू?, उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला आयोध्येत
  • तुम्ही राममंदिर बांधता की आम्ही बांधू?, उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला आयोध्येत
  • तुम्ही राममंदिर बांधता की आम्ही बांधू?, उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला आयोध्येत
SHARE

'राममंदिर बांधू' हे आश्वासन देऊन तुम्ही सत्तेत आलात याचा विसर तुम्हाला पडला असेल. तुमची स्मरणशक्ती कमजोर असेल. पण आमची नाही. आम्ही आहोत तुम्हाला आठवण करून द्यायला. त्यामुळं सांगा राम मंदिर तुम्ही बांधता की आम्ही बांधू? राम मंदिराच्या बांधकामाला लवकरात लवकर सुरूवात झाली नाही, तर तमाम हिंदुंना घेऊन आम्हाला राममंदिर बांधावं लागेलं, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपाला चांगलीच धोबीपछाड दिली. एवढंच नाही, उद्धव यांनी २५ नोव्हेंबरला हातात भगवा झेंडा घेऊन आयोध्येत जाणार असल्याचीही घोषणा केली.


राम मंदिरचं आश्वासन एक जुमला

दादरच्या शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात? याकडे शिवसैनिकांसह राजकीय जाणकारांचं लक्ष लागलं होतं. त्यानुसार अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर, पेट्रोल-डिझेलवाढ, महागाईचा मुद्दा उचलून धरत पंतप्रधान नरेंद्र मोदी-अमित शहा यांच्यावर निशाणा साधला. दरवर्षी रावण जाळला जातो, रावण जळतच आहे, पण राम मंदिर काही होत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराचं आश्वासन हाही एक जुमलाच निघाल्याचं म्हणत भाजपा आणि मोदींवर टिकास्त्र सोडलं.
मनगटात बळ पाहिजे

राम मंदिराचं शिवधनुष्य पेलायला छाती किती इंचाची हे महत्वाचं नाही, त्यासाठी मनगटात बळ असावं लागतं, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराच्या निर्माणासाठी आता शिवसेनेकडून पाऊलं उचलली जाणार असल्याचं जाहीर केलं. त्याचाच भाग म्हणून आपण स्वत: २५ नोव्हेंबरला आयोध्येत भगवा झेंडा घेऊन जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. पंतप्रधान जगभर फिरतात, पण याच पंतप्रधानांना आपण ज्या राज्यातून निवडून आलोय, त्या राज्यातील आयोध्या आठवत नाही, अशी टीकाही मोदींवर केली.


दुष्काळ जाहीर करा

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा दुष्काळात होरपळतो आणि आपले मुख्यमंत्री मंत्र्यांच्या अहवालाची वाट पाहताहेत. अहवाल येणार मग ते अभ्यास करणार असंच सुरू राहणार, तोवर किती तरी जणं मरणार, दुष्काळ भीषण होणार. हा कसला कारभार? असं म्हणत दुष्काळाच्या मुद्दयावरूनही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवरही जोरदार टीका केली. कर्नाटकात दुष्काळ जाहीर होतो, मग आपले मुख्यमंत्री दुष्काळ जाहीर का करत नाहीत? असा सवाल करत त्यांनी त्वरीत दुष्काळ जाहीर न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही दिला.
विष्णूचा ११ वा अवतार

तर, दुसरीकडे पेट्रोल-डिझेल आणि महागाईच्या मुद्दयावरूनही उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि भाजपाला टार्गेट केलं. इंधनाचे दर वाढत असताना भाजपाचे मंत्री आपल्या हातात काही नाही म्हणतात. अरे मग तुमच्या हातात काय आहे? असा सवाल करतानाच तुमच्याकडे विष्णूचा ११ वा अवतार असताना तुमच्या हातात कसं काही नाही? असं म्हणत मोदींची खिल्लीही उडवली आहे.


मिटू मिटू नको, कानाखाली काढा

#MeToo चं वादळ देशभर उठलं असून #MeToo ची अनेक प्रकरण पुढं येताहेत. त्यामुळं महिला सुरक्षित नसल्याचं समोर येत असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे यांनी 'मिटू मिटू नको, कानाखाली काढा', असं आवाहन महिलांना केलं. तर कुठलाही अत्याचार महिलांवर होत असेल तर सरळ जवळच्या शाखेत या असंही आवाहन करत महिलांच्या सुरक्षिततेसाठी शिवसैनिक बांधील असल्याचं स्पष्ट केलं.
३७० कलम काढा, सेना तुमच्या पाठिशी

सत्तेत येण्यासाठी जसं राम मंदिराचं आश्वासन दिलं तसंच काश्मीरमधलं ३७० कलम काढण्याचंही आश्वासन दिलं होतं. पण याही आश्वसानाचा विसर मोदी-भाजपाला पडला आहे. काश्मीर जळतोच आहे. तेव्हा ३७० कलम काढण्याची धमक दाखवा, त्यासंबंधीचा ठराव लोकसभेत आणा, तुमच्या पाठिशी शिवसेना हा ठराव मंजूर करण्यासाठी उभी राहिल, असं आव्हानही उद्धव ठाकरे यांनी मोदींना दिलं.हेही वाचा-

#MeToo: नाना 'तसे' नाहीत, राज यांनी केली पाठराखण!

दारू नको, दुष्काळग्रस्तांना घरपोच मदत पोहचवा; उद्धवचा सरकारला टोलासंबंधित विषय
ताज्या बातम्या