मनसेशी युती? शक्यच नाही! - संजय निरुपम

पाडव्याला झालेल्या मनसे मेळाव्यात 'मोदींविरुद्ध सर्व पक्षांनी एकत्र यायला हवे', असे राज ठाकरे म्हणाले आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे यांची युती होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं. मात्र, या साऱ्या चर्चा केवळ अफवा असल्याचं सांगत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

'मनसे पक्षाला कोणताही विचार नाही'

'भविष्यात आमची अशी कोणतीही युती होणार नाही, कारण काँग्रेस नेहमी समविचारी पक्षांशी युती करते आणि मनसे हा कोणताही विचार नसलेला पक्ष आहे. मनसे फक्त समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आला आहे. मनसे जातीयवाद निर्माण करत आहे. मनसे भारतीय संविधानाचा आदर करत नाही. मनसे जाती, भाषा, प्रांत, धर्म यामध्ये कायम भेदभाव करत आलेला आहे. अशा पक्षाशी काँग्रेस कधीच युती करणार नाही. याउलट काँग्रेस जाती, भाषा, प्रांत, धर्म यामध्ये भेदभाव मानत नाही आणि नेहमीच सर्व जाती आणि धर्मांचा आदर करत आलेली आहे,' अशा शब्दांत संजय निरुपम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

'मनसेच्या गुंडगिरीचा निषेध'

'मनसेने याआधी उत्तर भारतीयांना मारझोड केली. उत्तर भारतीय रिक्षा व टॅक्सीवाले यांना भयंकर त्रास दिला आणि आता गुजराती समाजाला मनसे त्रास देत आहे. दोन दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी कांदिवली येथे दुकानांवरील पाट्यांची तोडफोड केली. कारण त्या पाट्या गुजरातीमध्ये होत्या. मनसेच्या या गुंडगिरीचा मी निषेध करतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं. 'शासनामध्ये शिवसेना आणि भाजपाचेच सरकार आहे, त्यांनी कारवाई करावी. ही सरकारची जबाबदारी आहे. मनसेला हा अधिकार कोणी दिला? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

'जनतेला मोदी नको आहेत'

मोदीमुक्त भारत आम्हालाही पाहिजे आहे. कारण नरेंद्र मोदी आणि त्यांच्या विचारांचा आम्ही विरोध करतो. येत्या निवडणुकीत भारतीय जनतेला नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून नको आहेत. त्यामुळे भविष्यात मोदीमुक्त भारत नक्की होणार आहे. काँग्रेस शिवसेना, मनसे आणि भाजपा यांच्याशी कधीच युती करणार नाही, असे त्यांनी संजय निरूपम यांनी नमूद केले.


हेही वाचा

मुंबईतील गुजराती व्यापाऱ्यांना संरक्षण द्या - संजय निरूपम

पुढील बातमी
इतर बातम्या