मुंबईचे डबेवालेही जाणार अयोध्येला, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याला पाठिंबा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात आपण अयोध्येला जाणार असल्याचं जाहीर केलं होतं. दरम्यान उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आता मुंबईचे डबेवाले देखील अयोध्येला जाणार असल्याची माहिती प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी दिली आहे. मुंबईतून शिवसैनिक मोठ्या प्रमाणात अयोध्येला जाणार असून त्यांच्यासाठी विशेष रेल्वेची सोय केली जाणार असल्याचं कळत आहे. या रेल्वेने डबेवाले आयोध्येला रवाना होणार आहेत.

शिष्टमंडळाचा समावेश

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला पाठिंबा देण्यासाठी वारकरी, साधू-महंत तसंच राज्यातील अनेक संघटना अयोध्येला जाणार आहेत. तसंच, मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांच्या नेतृत्वात डबेवाल्यांचं एक शिष्टमंडळ अयोध्येला जाणार आहे. यामध्ये सुभाष तळेकर, विठ्ठल सावंत, दशरथ केदारी, कैलाश शिंदे, आनंथा तळेकर यांच्यासह अनेक डबेवाल्यांचा समावेश असेल. दरम्यान, डबेवाल्यांच्या अयोध्या दौऱ्यामुळे डबे पोहोचवण्याच्या व्यवसायावर काही परिणाम होणार नाही.

खंबीरपणे उभं राहणार

राम मंदिराच्या मुद्द्यावर हिंदूत्ववादी संघटनांसह या मुद्यावर हिंदुत्ववादी संघटनांसह काँग्रेसनेही आमच्या आंदोलनात सहभागी व्हावं, असं आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. त्याचप्रमाणे डबेवाल्यांच्या संकटाच्या काळात ठाकरे कुटुंब आणि शिवसेना नेहमी त्यांच्या मागे उभी राहत आली आहे. हीच जाणीव ठेवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मागे खंबीरपणे उभं राहण्याचं मुंबई डबेवाला असोसिएशन ठरवलं आहे, असे सुभाष तळेकर यांनी सांगितलं.


हेही वाचा-

तर, राम मंदिर उभारण्यासाठी १ हजार वर्षे लागतील- संजय राऊत

बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी स्मारकाचं भूमिपूजन?


पुढील बातमी
इतर बातम्या